Women Suicide Pudhari
पुणे

Pune Crime: बिबवेवाडीत महिलेचे टोकाचे पाऊल; जीम ट्रेनरसह 2 जणांना अटक

मानसिक छळ व सार्वजनिक अपमानातून टोकाचा निर्णय; 6 जणांवर गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सर्वांसमोर पतीचा झालेला अपमान सहन न झाल्याने तणावातून महिलेने सुसाईड नोट लिहून घरात गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी, बिबवेवाडी पोलिसांनी एका जीम ट्रेनरसह त्याच्या पत्नीला अटक केली असून, डॉक्टर महिलेसह 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मोनाली गौरव धुर्डे (वय 34, रा. विघ्नहरनगर, रणधीर हाऊस, बिबवेवाडी) आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

सचिन मोहन जुन्नरकर (वय 38) आणि त्याची पत्नी अश्विनी सचिन जुन्नरकर (वय 33, दोघे रा. ढमाले कॉम्प्लेक्स, सुखसागरनगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर महेश राजेंद्र अंबिलवादे, नीता महेश अंबिलवादे (रा. गुजरवाडी, कात्रज) आणि डॉ. अमिता ढेकणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना बिबवेवाडीतील विघ्नहरनगरमधील रणधीर हाऊस येथे 27 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा ते 28 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजून 50 मिनिटांच्या दरम्यान घडली. याबाबत मोनाली यांच्या पतीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन जुन्नरकर हा जीम ट्रेनर म्हणून काम करतो. त्याच ठिकाणी मोनाली धुर्डे ही रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होती. सचिन जुन्नरकर याने जीममध्ये काम करत असताना मोनाली हिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. त्यातून तो तिला त्रास देऊ लागला. सचिन जुन्नरकर, अश्विनी जुन्नरकर व इतर आरोपी हे त्यांच्या घरात अनधिकृतपणे शिरले. त्यांनी मोनाली व तिच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली. सर्वांसमोर फिर्यादी व त्यांची पत्नी मोनाली यांना अपमानित केले.

फिर्यादी व मोनाली पोलिस चौकीत गेले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी मेडिकल यादी दिली. ते उपचार करून दोघे घरी गेले. दरम्यान, इतर आरोपींनी मोनाली हिला फोन करून तू पोलिसांकडे तक्रार देऊ नको, नाही तर वाईट परिणाम होतील, असे धमकावले होते. त्यातून मोनालीचा मानसिक ताण वाढला. रात्री फिर्यादी हे झोपले असताना मोनाली हिने सुसाईड नोट लिहून घरी मुलाला झोका खेळण्यासाठी छताच्या हुकाला आधी लावलेल्या दोरीला गळफास घेऊन आपले जीवन संपविले. फिर्यादी यांना पहाटे 4 वाजून 50 मिनिटांनी जाग आल्यावर मोनालीने गळफास घेतल्याचे समजले.

काय लिहिले चिठ्ठीत?

माझ्यामुळे माझ्या पतीला अपमानित व्हावे लागले. या प्रकाराला मीच जबाबदार आहे, असे मोनाली हिने चिठ्ठीत लिहिले होते. सर्वांसमोर मारहाण करून लोकांसमोर झालेला अपमान तिच्या जिव्हारी लागला. त्या तणावातून तिने हा टोकाचा निर्णय घेतला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते, सहायक पोलिस निरीक्षक सावंत यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. पोलिस उपनिरीक्षक भरत वाघ तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT