पुणे

पुणे बनतेय चित्रनगरी

अमृता चौगुले

सुवर्णा चव्हाण

पुणे : सध्या पुण्यातही वेब सिरिजपासून ते चित्रपटांपर्यंत… जाहिरातींपासून ते लघुपटांपर्यंतचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणात सुरू असून मुंबई, कोल्हापूरनंतर आता पुणे हे चित्रीकरणासाठीचे आवडते ठिकाण बनले आहे. पुण्यातील कॅम्प, लोणावळा, भोर, भूगाव, कोथरूड, हिंजवडी अशा विविध ठिकाणी हिंदीसह मराठी वेब सिरिज, चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. पावसाळ्याचा सुरु होण्यापूर्वी निर्माते-दिग्दर्शक चित्रीकरण पूर्ण करण्यात व्यग्र असून, कोरोनाची स्थिती सुरळीत झाल्यानंतर चित्रीकरणासाठी परवानगीही मिळू लागली आहे.

दरवर्षी 400 ते 500 विविध प्रकारचे चित्रीकरण पुण्यात होते. आता चित्रीकरण सुरू असून, हिंदी-मराठीतील पाच ते सहा वेब सिरीज, तसेच सात ते आठ चित्रपटांचे चित्रीकरण सुरू आहे. त्यासह 2 ते 3 मालिका, काही जाहिरातींच्या चित्रीकरणासह लघुपट, गाण्यांचे अल्बम आदीचे चित्रीकरण करण्यात येत आहे.

दिग्दर्शक भाऊराव कर्‍हाडे म्हणाले, 'नुकतेच आम्ही एका चित्रपटाचे चित्रीकरण पुणे आणि नगरमध्ये केले. मुंबईपेक्षा पुण्यात लाईव्ह लोकेशनची मजा वेगळी आहे. इथे खर्च कमी येतो. त्यामुळे पुण्यातही चित्रीकरण करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यानुसार नियोजन करून चित्रीकरण केले जात आहे.' कार्यकारी निर्माते अमित शेरखाने म्हणाले, 'पुण्यात भोर, भूगाव, कॅम्प अशा वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे. पुणे हे चित्रीकरणासाठी आवडते ठिकाण बनले आहे. सर्व काळजी घेऊन आम्ही चित्रीकरण करत आहोत.'

पुढील महिन्यापासून पावसाळा सुरू होणार असल्याने त्याआधी चित्रीकरण करण्याला निर्माते आणि दिग्दर्शकांनी प्राधान्य दिले आहे. मध्यवर्ती ठिकाण असल्याने चित्रीकरणासाठी सध्या पुण्याला पसंती दिली जात आहे.

– मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, मराठी चित्रपट महामंडळ

SCROLL FOR NEXT