नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नोकरी लावण्याच्या बदल्यात उमेदवारांकडून प्लॉट आणि जमिनी घेण्याच्या प्रकरणात राजद नेते लालू प्रसाद यादव अडकले असून सीबीआयने त्यांच्यावर नवीन गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सीबीआयने यादव यांच्याशी संबंधित 16 ठिकाणांवर शुक्रवारी छापे टाकत पुरावे जमा केल्याची माहिती सीबीआय सूत्रांनी दिली.
लालू यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगी मिसा भारती यांच्या दिल्ली, पाटणा, गोपालगंजसहित इतर ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले. सीबीआयने यासंदर्भात वरील लोकांसोबतच काही उमेदवारांवरही गुन्हे दाखल केले आहेत. ज्या उमेदवारांवर भरावयास पैसे नव्हते, त्यांच्याकडून प्लॉट आणि जमिनी घेऊन नोकरी लावल्याचा गंभीर आरोप लालू प्रसाद यादव यांच्यावर आहे. वर्ष 2004 ते 2009 या कालावधीत लालूप्रसाद यादव केंद्रात रेल्वेमंत्री त्यावेळी हा भ्रष्टाचार झाला असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.
पाटणा येथील राबडीदेवी यांच्या 10, सर्क्युलर मार्गावरील निवासस्थानी शुक्रवारी सकाळी सीबीआयचे पथक पोहोचले. याठिकाणी दिवसभर सीबीआयची कारवाई सुरु होती. कारवाईच्या पार्श्वभूमीवर सर्क्युलर मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 73 वर्षीय लालू यादव यांना अलीकडेच चारा घोटाळ्यातील पाचव्या प्रकरणात जामीन मिळाला होता. चारा घोटाळ्यातील त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले असून सध्या ते शिक्षा भोगत आहेत. जामीन मिळाल्यानंतर लालू यादव यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. चारा घोटाळ्यात झालेली निम्मी शिक्षा भोगलेली असल्याने मुक्तता करावी, अशी विनंती लालू यादव यांनी न्यायालयाकडे केली होती. मात्र त्यांच्या या अर्जाला सीबीआयने विरोध केलेला आहे.
चारा घोटाळ्यात लालू यादव यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजपवाले सूडबुद्धीने बदला घेत असल्याचे तेजस्वी यांनी सांगितले होते. दरम्यान लालू यादव यांच्यावर नव्याने होत असलेल्या कारवाईवर राजदची प्रतिक्रिया आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीन कुमार आणि लालू यादव यांच्यातील मतभेद कमी होत असल्याने केंद्रीय तपास संस्थांचा वापर करून लालू यादव यांना प्रताडीत केले जात असल्याचे राजदचे आमदार मुकेश रोशन यांनी सांगितले आहे.
पहा व्हिडीओ : ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्याशी खास गप्पा