Theatre Pudhari
पुणे

Pune Balanatak Season: पुण्यात बालनाट्य हंगाम सुरू; नाट्यगृहांच्या तारखांचा तुटवडा

नाट्यसंस्थांची कसरत; नवीन आणि जुन्या नाटकांच्या प्रयोगांची तयारी जोरात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आजी- आजोबांच्या गोष्टी ते जादुई दुनियेची सफर... मोबाईलचे दुष्परिणाम ते आपली सुरक्षा... अशा विविध विषयांवरील बालनाटकांचे प्रयोग बालरंगभूमीवर होणार आहेत. कारण, बालरंगभूमीचा पडदा येत्या 15 एप्रिलपासून उघडणार असून, जुन्या नाटकांसह नवीन नाटकांचेही प्रयोग रंगभूमीवर होणार आहे. त्यासाठी नाट्य संस्थांची जोरदार तयारी सुरू असून, अनेक संस्थांनी तर नाट्यमहोत्सव आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. पण, तयारीचा उत्साह पाहायला मिळत असला, तरी संस्थांना नाट्यगृहांच्या तारखा मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

तारखांच्या आगाऊ बुकिंगसाठी महापालिकेच्या नाट्यगृहांचे तर सोडा, खासगी नाट्यगृहांच्या तारखाही मिळत नसल्याचे नाट्यनिर्माते- दिग्दर्शकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रयोगांसाठी नियोजन करण्यात संस्थांना अनेक अडचणी येत आहेत. मराठी रंगभूमीला बालनाटकांची मोठी परंपरा आहे. शाळांना सुट्टी लागली की, काही दिवस आगोदर नाट्य संस्थांकडून बालनाटकांच्या प्रयोगांना सुरुवात होते. एप्रिल ते जून या कालावधीत नव्या- जुन्या बाल नाटकांचे प्रयोग मुलांना पाहायला मिळतात. यंदा 15 एप्रिलनंतर बालनाटकांच्या प्रयोगांना सुरुवात होणार आहे.

पण, नाट्यनिर्माते- दिग्दर्शकांसमोर सर्वांत मोठी अडचण आहे ती नाट्यगृहांच्या तारखा मिळवण्याची. काही संस्थांनी महापालिकेच्या नाट्यगृहांच्या तारखांसाठी अर्ज केले आहेत. तर, काही संस्थांची नाट्यगृहांसाठी शोधाशोध सुरू आहे. आता काय करावे, ही स्थिती संस्थांसमोर आहे. याविषयी संतोष माकुडे म्हणाले, की बालनाटकांच्या प्रयोगासाठी नाट्यगृहांच्या तारखा मिळवण्यासाठी खूप अडचणी येतात. ही नेहमीची अडचण आहे. पालिकेच्या नाट्यगृहांच्या तारखा मिळणे शक्य नसल्याने यंदा आम्ही खासगी नाट्यगृहाच्या तारखा बुक केल्या आहेत. नाट्यगृहांच्या तारखांच्या आगाऊ बुकिंगसाठी नाट्य संस्थांना अडचणी येत आहेत.

आम्ही सई परांपजे यांच्या सहा नाटकांचा महोत्सव आयोजित केला आहे. त्याशिवाय आम्ही एका नवीन बालनाटकाची निर्मितीही करीत आहोत. या नाटकाचा प्रयोग 19 एप्रिलच्या आसपास सुरू होईल. यंदा काही नाट्यसंस्था जुन्याच नाटकांचे प्रयोग रंगभूमीवर करणार आहेत. तर, काही संस्थांनी नवीन नाट्य निर्मिती केली आहे. संस्थांमधील बाल कलाकारांची प्रयोगासाठीची जोरदार तयारी सुरू आहे.
देवेंद्र भिडे, बालनाट्यांचे दिग्दर्शक
आम्ही यंदा ‌‘डुंगू आणि पुंगू ही दोस्ती...‌’ आणि ‌‘अभ्यासाच्या नावाने‌’ ही नवीन दोन बालनाट्ये रंगभूमीवर आणत आहोत. पण, प्रयोगांसाठी पालिकेच्या नाट्यगृहांच्या तारखा मिळणे अवघड आहेच. त्यात खासगी नाट्यगृहांची उपलब्धता कमी झाली आहे. कारण, त्यांच्याही तारखा बुक आहेत. दर वर्षी आम्हाला सीझनमध्ये नाट्यगृहांच्या तारखा मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. आज बालनाट्य करणे खर्चिक झाले आहे. व्यावसायिक नाटकांसोबत आता बालनाटकाच्या एका प्रयोगाचा खर्चही महागला आहे. खर्च कमी व्हावा म्हणून काही संस्था त्यांची जुन्या नाटकांचे प्रयोग करतात, तर काही संस्था जोखीम पत्करत नवीन नाटक रंगभूमीवर आणत आहेत.
देवदत्त पाठक, बालनाटकांचे दिग्दर्शक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT