Arrested Pudhari
पुणे

Pune Crime Arrest: भोंदू ऋषीकेश वैद्यला अटक; महिलेला फसवून अत्याचार केल्याचा आरोप

महादेव भक्त असल्याचे भासवून महिलेला जाळ्यात ओढल्याचा आरोप; पुणे पोलिसांनी पिंपरीतून आरोपीला पकडले आणि पुढील तपास सुरू केला

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महादेवाचा भक्त असल्याची बतावणी करत महिलेवर अत्याचार करून पसार झालेला भोंदू ऋषीकेश वैद्य याला अखेर पुणे पोलिसांनी पिंपरी परिसरातून अटक केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मदतीने मांजरी पोलिसांनी वैद्य याला ताब्यात घेतले. याबाबत एका 35 वर्षीय महिलेने वसई येथील माणिकपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पीडित महिला मूळची पुण्यातील आहे. त्यानंतर हा गुन्हा झीरोने वर्ग करून मांजरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

ऑक्टोबर 2023 मध्ये महिलेची भोंदू ऋषीकेश वैद्य याच्याशी समाजमाध्यमातून ओळख झाली. आरोपी मूळचा वसईचा आहे. पीडित महिला वतवैकल्ये करायची. भोंदूने तिला जाळ्यात ओढले. ‌‘मी महादेवाचा भक्त असून, महादेवाची उपासना कशी कारायची हे तुला शिकवितो,‌’ अशी बतावणी त्याने महिलेकडे केली. त्यानंतर त्याने महिलेला जाळ्यात ओढले. आरोपी 2023 मध्ये पुण्यात आला. त्याने पीडित महिलेची मांजरी परिसरात भेट घेतली. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने तिला पुन्हा वसईत बोलावले. वसईतही तिच्यावर अत्याचार केला.

नाशिकमधील भोंदू अशोक खरात याने महिलांना जाळ्यात ओढून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यातील पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती तिने पोलिसांनी दिली. सुरुवातीला तिने वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वसई पोलिसांनी संंबंधित गुन्हा तपासासाठी पुण्यातील हडपसर भागात मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग केला.

दरम्यान, वैद्य याचा पुणे पोलिसांची पथके शोध घेत होती. त्यावेळी तो पिंपरी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. ‌‘वैद्य याने आणखी काही महिलांवर अत्याचार केल्याची शक्यता आहे. दैवी शक्तीचा संचार झाल्याची बतावणी करून त्याने महिलेवर अत्याचार केेले. अशा प्रकारची कुणाची तक्रार असल्यास पीडित महिलांनी पुणे पोलिसांकडे तक्रार द्यावी,‌’ असे आवाहन त्यांनी केले आहे.

आरोपीची सहा एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी

पोलिसांनी शनिवारी दुपारी कडेकोट बंदोबस्तात वैद्यला वानवडी येथील लष्कर न्यायालयात हजर केले. आरोपीच्या लैंगिक सक्षमतेची तपासणी करायची आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करायची आहे. आरोपीने पीडितेची आक्षेपार्ह छायाचित्रे समाज माध्यमात पाठविली आहेत का? त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील कविता कांबळे यांनी केली. आरोपीतर्फे ॲड. साजिद शहा, ॲड. पवन कुलकर्णी, ॲड. रामजी कोथली यांनी बाजू मांडताना आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकल्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. एस. जगदाळे यांच्या न्यायालयाने आरोपीला 6 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT