पुणे: उत्तमनगरातील एनडीए रस्त्यावर शस्त्रधारी टोळक्याने वर्दळीच्या वेळी सराफा दुकानात घुसून लुटमार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. दुकान मालकाने विरोध करत आरडाओरडा केल्याने तिघे पसार झाले.
याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात २८ वर्षीय तरुण व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (दि. 29) रात्री ८ वाजता एनडीए रस्ता उत्तमनगर येथे ही घटना घडली.
फिर्यादीचे एनडीए रस्त्यावर मोरया ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. फिर्यादी रात्री ८ च्या सुमारास बसलेले असताना तिघे जण शस्त्रे घेऊन दुकानात शिरले. त्यांनी काउंटर फोडत धमकावण्यास सुरुवात केली. फिर्यादींना देखील मारहाण केली आणि दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जखमी अवस्थेत विरोध करून आरडाओरड केली.
रहदारीचा रस्ता असल्याने मोठ्या संख्येने नागरिक जमा होऊ लागताच लूटमार करणाऱ्यांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रियंका गायकवाड करत आहेत.
आणखी एका ठिकाणी लुटमारीचा प्रयत्न
शिवणे भागातही एका सराफी दुकानावर शस्त्र घेऊन लुटमार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी 32 वर्षीय सराफ व्यावसायिकाने उत्तमनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादीचे शिवणे भागात विजयालक्ष्मी ज्वेलर्स दुकान आहे. लुटारूंनी लोखंडी रॉडने मारहाण केली. फिर्यादी जोरात ओरडल्याने आजूबाजूचे लोक आल्याने आरोपी पळून गेले. उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन घटना घडल्यानंतर देखील पोलिसांना या आरोपींचा शोध लागला नाही.