Theatre Pudhari
पुणे

Pune Theatre Rehearsal Spaces: पुण्यात कलाकारांसमोर तालमींचे संकट; परवडणाऱ्या सराव जागांची मागणी

वाढते भाडे, वेळेचे निर्बंध आणि महापालिकेच्या सुविधांचा अभाव; रंगकर्मींची स्वतंत्र सांस्कृतिक तालीम केंद्रांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नाट्यप्रयोगासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या यशस्वी सादरीकरणासाठी कलाकारांच्या रंगीत तालमी, सराव होणे गरजेचे असते. मात्र, कलाकारांना आपली कलेची रंगीत तालीम वा सराव करण्यासाठी सध्या पुण्यात केवळ दहा ते बारा खासगी सांस्कृतिक केंद्र उपलब्ध आहेत. त्यात महापालिकेची एकही जागा नसल्याने आणि सरावासाठी खासगी जागा भाड्याने घेणे परवडणारे नसल्याने तालमी कुठे करायच्या? असा प्रश्न कलाकारांना भेडसावत आहे. महापालिकेने आणि कलाप्रेमी संस्थांनी पुढाकार घेऊन रंगीत तालीम, सरावासाठीच्या जागा उपलब्ध करून द्याव्यात, असे विनंती कलाकारांकडून करण्यात येत आहे.

पुण्यात व्यावसायिक, प्रायोगिक नाट्यप्रयोगांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. मात्र, जागांसाठी वाढलेले भाडे, वेळेची मर्यादा, पार्किंगची अडचण आणि रात्री उशिरापर्यंत सरावाला मिळत नसलेली परवानगी, यामुळे कलाकारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. बालगंधर्व रंगमंदिर, भरत नाट्य मंदिर, टिळक स्मारक मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, यांसारख्या विविध नाट्यगृहांमध्ये मुख्य प्रयोग होतात.

मात्र, तालमीसाठी त्या जागा उपलब्ध होत नाहीत. एका नाटकासाठी साधारणतः एक ते दीड महिना सातत्याने तालीम करावी लागते. त्यासाठी मोठी मोकळी जागा, प्रकाशयोजना, ध्वनिव्यवस्था आणि रात्रीपर्यंत सरावाची परवानगी आवश्यक असते. मात्र, पुण्यात अशा सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक नाट्य संस्था नाइलाजाने आता शाळांच्या वर्गखोल्या, सोसायट्यांमधील सभागृह किंवा छोट्या सभागृहांमध्ये तालमी करीत आहेत.

पुण्यासारख्या शहरात विभागनिहाय सांस्कृतिक तालीम केंद्रांची गरज असल्याचे कलाकारांचे म्हणणे आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे संयोजक सुनील महाजन म्हणाले की, सध्या सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. पण, त्याआधी होणाऱ्या तालमींसाठी पुण्यात जागा उपलब्ध नाहीत. मोजक्याच जागा उपलब्ध आहेत. पण, त्याचे भाडे परवडणारे नाही. त्यामुळे तालमी करायच्या कुठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेनेही पुण्यातील वाढत्या सांस्कृतिक कार्यक्रम, नाटकांच्या प्रयोगांची दखल घेऊन तालमींसाठी सांस्कृतिक केंद्रांची निर्मिती करावी, हे खूप गरजेचे आहे.

वाढते भाडे, मर्यादित वेळा

तालमीसाठीच्या असलेल्या खासगी सभागृहांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या ठिकाणी पाच ते सहा तासांसाठी सुमारे दोन ते तीन हजार रुपयांचे भाडे आकारले जाते. त्यातच वेळेचे निर्बंध असल्याने कलाकारांना रात्री उशिरापर्यंत सराव करता येत नाही. त्यामुळे काही संस्था आणि कलाकारांनी ऑनलाइन रीडिंग आणि डिजिटल तालीम यांचा पर्याय स्वीकारला असला, तरी प्रत्यक्ष रंगमंचीय सरावाला पर्याय नसल्याचे रंगकर्मी सांगतात.

पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक, राज्य नाट्य स्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा अशा काळात तालमींसाठी जागांची मागणी अधिक वाढते. सध्या तालमींचा काळ सुरू झाला आहे. पण, तालमीसाठी जागा मिळविणे, हेच मोठे संकट बनले आहे. अनेकदा छोट्या जागेसाठीही मोठे भाडे द्यावे लागते. काही गटांकडे तेवढे आर्थिक पाठबळ नसते. त्यामुळे अनेक अडचणी येतात. राज्य सरकार आणि महापालिकेने कमी दरात उपलब्ध होणारी स्वतंत्र सांस्कृतिक तालीम केंद्र उभारली पाहिजेत.
राहुल लामखडे, प्रायोगिक नाटकांचे दिग्दर्शक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT