

पुणे: नशेसाठी तरुणांना मेफेन्टरमाईन या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पकडले आहे. त्याच्याकडून 83 बॉटल जप्त केल्या आहेत. अभिषेक खंडू भडंगे (वय 25, रा. हिंगणे मळा हडपसर) असे त्याचे नाव आहे.
तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई ही झाली होती. नुकताच तो कारागृहातून बाहेर आला आहे. याबाबत पोलिस हवालदार नितीन मुंढे यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी भडंगेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक भडंगे हा प्रतिबंधित असलेल्या एका ॲपवरून इंजेक्शनच्या बाटल्या मागवत होता. त्यानंतर तो व्हाट्सॲप, इन्स्टाग््राामवरून तरुणांना विक्री करीत होता. याबाबतची माहिती पोलिस हवालदार मुंढे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून भडंगे याला ताब्यात घेतले. आरोपीकडे हे औषध विकण्याचा परवाना नव्हता.
इतकेच नव्हे, तर त्याने अशा औषधांच्या विक्री आणि वापरासंबंधी कोणतेही अधिकृत प्रशिक्षण घेतलेले नव्हते, तरीही तो या इंजेक्शनची विक्री करत होता, असे तपासात उघड झाले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने यांच्या मार्गदर्शनात सुरेंद्र जगदाळे, कानिफनाथ कारखेले, तानाजी देशमुख यांच्या पथकाने केली.
ओव्हरडोस झाल्यास मृत्यूचाही धोका
मेफेन्टरमाइन सल्फेट हे एक शक्तिशाली औषध आहे, जे सामान्यतः रुग्णालयांमध्ये रक्तदाब अचानक कमी होण्यावर उपचारासाठी वापरले जाते. जर हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरले गेले किंवा चुकीच्या मात्रेत दिले गेले, तर त्यामुळे हृदयाचे ठोके असामान्यपणे वाढणे, रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत वाढणे, मानसिक असंतुलन, चिंता, चक्कर येणे, झटके येणे आणि गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अनेक प्रकरणांमध्ये मृत्यूचा धोकाही असतो.