पुणे: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणावर धारधार हत्याराने वार करून खून करण्यात आला. ही घटना कात्रजमधील आंबेगाव भागात रविवारी (दि.10) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास इंद्रायणी कमानीजवळ घडली. दीपक क्षीरसागर (वय 38, रा. समर्थ हाईट्स, इंद्रायणीनगर, टेल्को कॉलनी, आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी सिद्धार्थ संजय हातुरे (वय 26), ऋषीकेश मनोहर गायकवाड (वय 29, रा. जयशंकर सोसायटी, इंद्रायणीनगर, आंबेगाव) या दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत कविता साठे (वय 34, रा. आंबेगाव खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आरोपींच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा भाऊ दीपक क्षीरसागर हा पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कामाला होता. तो विवाहित होता.
रविवारी रात्री जेवण केल्यानंतर तो इंद्रायणीनगर भागात घरासमोर थांबला होता. त्या वेळी दोघांनी त्याच्यावर धारधार हत्याराने वार केले. या घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी खून प्रकरणात चौकशी केली.
तेव्हा दीपक याचा अनैतिक संबंधातून खून झाल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली. आरोपीच्या नात्यातील महिलेसोबत दीपक याचे अनैतिक संबंध होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी दिली.