पुणे: नव्या जमान्यात नवेपणाकडे वळत रेडिआचे माध्यमही बदलले आहे. तंत्रज्ञानयुगात आता रेडिओवरील कार्यक्रम श्रोत्यांना मोबाईल ॲपवर ऐकायला मिळत आहेत. प्रसारभारतीनेही नवेपणा स्वीकारत सर्व आकाशवाणी केंद्र मोबाईल ॲपशी जोडले असून, श्रोत्यांना ॲपद्वारे सर्व आकाशवाणी केंद्रांचे कार्यक्रम ऐकण्याची संधी मिळत आहे. ‘न्यूज ऑन एअर आणि वेव्हज’ या मोबाईल ॲपद्वारे पुणे आकाशवाणी केंद्रातील कार्यक्रमांचे प्रसारण श्रोते थेट (लाइव्ह) ऐकत असून, ॲपद्वारे हे प्रसारण ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या संख्येत पुणे शहर हे भारतात प्रथम क्रमांकावर आहे. इतकेच नव्हे, तर आकाशवाणी केंद्रांसह काही खासगी रेडिओ केंद्रांचे कार्यक्रमही ॲपद्वारे ऐकायला मिळत असून, आज रेडिओच्या माध्यमानेही नवेपणाची झेप घेतली आहे.
रेडिओ म्हणजे आठवणींचा खजिना... जुन्या पिढीचे मनोरंजनाचे साधन त्याकाळी फक्त रेडिओवरील कार्यक्रम होते... रेडिओ हे माध्यम अनेक वर्षांपासून लोकांच्या मनोरंजनाचे आणि माहितीचे महत्त्वाचे साधन आहे. आता बदलत्या तंत्रज्ञानामुळे रेडिओ ऐकण्यासाठी केवळ रेडिओ सेटची गरज उरलेली नाही. मोबाईलवर विविध ॲपच्या माध्यमातून रेडिओ ऐकता येत आहे. ‘न्यूज ऑन एअर आणि वेव्हज्’ या ॲपवर आकाशवाणीच्या सर्व केंद्रांच्या कार्यक्रमांचे थेट (लाइव्ह) प्रसारण होत आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या ॲपद्वारे देशभरातील विविध खासगी रेडिओ चॅनेल्सच्या कार्यक्रमांचेही थेट प्रसारण होत आहे. ॲपमुळे विविध प्रादेशिक भाषांमधील रेडिओ चॅनेल्सवरील कार्यक्रम एकाच ठिकाणी श्रोत्यांना ऐकायला मिळत असून, रेडिओ आता केवळ ट्रान्झिस्टरपुरता मर्यादित न राहता विविध डिजिटल ॲप्सद्वारे मोबाईलवर उपलब्ध झाला आहे.
ॲपमुळे बातम्या, गाणी, मुलाखती, चर्चात्मक कार्यक्रम आणि मनोरंजक कार्यक्रम एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत. त्यामुळे तरुणाईसह सर्व वयोगटांतील श्रोत्यांसाठी रेडिओ अधिक सोयीस्कर झाला आहे. पारंपरिक रेडिओला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने रेडिओ माध्यम नव्या आणि अधिक व्यापक स्वरूपात पुढे येत आहे. शुक्रवारी (दि. 13) साजऱ्या होणाऱ्या जागतिक रेडिओ दिनानिमित्त दै. ‘पुढारी’ने याबद्दल जाणून घेतले.
या नव्या बदलाबद्दल पुणे आकाशवाणी केंद्राचे प्रमुख इंद्रजित बागल म्हणाले की, पुणे आकाशवाणीचे केंद्र आता पंचाहत्तरीकडे वाटचाल करीत आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. त्यामुळे दर्जेदार कार्यक्रमांची परंपरा आकाशवाणी पुणे केंद्राने कायम राखली आहे. आता तंत्रज्ञानाच्या युगात आकाशवाणीनेही नवे बदल केले आहेत. प्रसारभारतीनेही सर्व आकाशवाणी केंद्र ‘न्यूज ऑन एअर आणि वेव्हज’ या मोबाईल ॲपशी जोडले आहेत. पुणे आकाशवाणी केंद्रातील कार्यक्रमांचे प्रसारण या ॲपद्वारे श्रोते लाइव्ह ऐकत असून, सर्व केंद्रांमध्ये पुणे केंद्रांचे कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे केंद्रांचे कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांची संख्या सुमारे 23 लाखांपेक्षा जास्त आहे. साहित्य, संस्कृती, क्रीडा, कला, संगीत, कृषी अशा विविध क्षेत्रांतील तसेच विविध वयोगटांकरिता आकाशवाणी पुणे केंद्रावर कार्यक्रम प्रसारित होतात. ‘101 उमा सदन’ ही कौटुंबिक श्रुतिका, वनिता मंडळ, युववाणी, माझे घर माझे शेत, रुपेरी मुकुटाचे मानकरी, आम्ही, विशेष गीतगंगा आदी कार्यक्रम सध्या पुणे आकाशवाणीवर सुरू आहेत.
ॲपमुळे झाले हे फायदे
श्रोत्यांना आवडते कार्यक्रम ऐकण्याची सुविधा.
काही रेडिओ ॲपवर पॉडकास्ट आणि खास डिजिटल शोही उपलब्ध.
श्रोते आपल्या आवडीनुसार कोणत्याही प्रादेशिक भाषेतील केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकतात.
रेडिओ केंद्रांना आपल्या कार्यक्रमांचे श्रोते वाढविण्याची मिळाली संधी.
ग््राामीण श्रोत्यांपर्यंतही रेडिओ ॲपच्या माध्यमातून कार्यक्रम पोहचले.