पुणे : पुणे विमानतळावर यंदा प्रवासी आणि विमानोड्डाणांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, पुणेकरांनी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करण्यात डबल धमाका केला आहे. विमानतळ प्रशासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून हे समोर आले आहे.
विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, यंदा प्रवासी आणि विमानोड्डाणांमध्ये दुप्पट वाढ नोंदवली आहे. या वाढीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे दुपटीने वाढली आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी आंतरराष्ट्रीय सोबतच देशांतर्गत प्रवाशांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. सुट्ट्या, व्यावसायिक दौरे, पर्यटन आणि शिक्षण अशा विविध कारणांमुळे पुणेकरांचा विमान प्रवासाकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर 2024 मध्ये 12,877 प्रवाशांनी पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता. तर सप्टेंबर 2025 मध्ये 22,308 प्रवाशांनी पुण्यातून आंतरराष्ट्रीय प्रवास केला. तसेच, ऑक्टोबर 2024 मध्ये 14,238 प्रवाशांनी पुण्यातून आंतरराष्ट्रीय प्रवास केला. तर ऑक्टोबर 2025 मध्ये 28,258 प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केल्याची नोंद पुणे विमानतळ प्रशासनाने केली. यावरून पुणे विमानतळावरील विमानांच्या उड्डाणांसोबतच प्रवाशी संख्या वाढल्याचे समोर आले आहे. प्रत्येक महिन्यात अशीच स्थिती असल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सप्टेंबर 2024 मध्ये 8,23,296 प्रवाशांनी तर सप्टेंबर 2025 मध्ये 8,50,214 प्रवाशांनी पुण्यातून देशांतर्गत प्रवास केला. तसेच ऑक्टोबर 2024 मध्ये 8,44,991 प्रवाशांनी तर ऑक्टोबर 2025 मध्ये 8,89,264 प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केल्याची नोंद पुणे विमानतळ प्रशासनाने केली. यावरून पुणे विमानतळावरील विमानांच्या उड्डाणांसोबतच प्रवाशी संख्या देखील वाढत असल्याचे दिसून आले.
सप्टेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय 109 विमानांची उड्डाणे झाली होती. तर यंदा सप्टेंबर 2025 मध्ये 202 आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे झाली. ऑक्टोबर 2024 मध्ये 105 विमानांनी आंतरराष्ट्रीय उड्डाण केले होते, तर यंदा ऑक्टोबरमध्ये 222 विमानांचे आंतरराष्ट्रीय उड्डाण झाले. गेल्या वर्षीच्या आणि यंदाच्या प्रत्येक महिन्यांची तुलना केली तर यंदा आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांची संख्या दुप्पटच असल्याचे समोर आले आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर 2024 मध्ये देशांतर्गत 5,473 विमानांची उड्डाणे झाली होती. तर यंदा सप्टेंबरमध्ये 5,702 देशांतर्गत विमानांची उड्डाणे झाली. ऑक्टोबर 2024 मध्ये 5,698 विमानांनी देशांतर्गत उड्डाण केले होते, तर यंदा ऑक्टोबरमध्ये 5,986 विमानांचे देशांतर्गत उड्डाण झाले. गेल्या वर्षीच्या आणि यंदाच्या प्रत्येक महिन्यांची तुलना केली, तर यंदा देशांतर्गत विमानोड्डाणांची संख्या अधिकअसल्याचे समोर आले आहे.
पुणे विमानतळावर झालेली प्रवाशी आणि विमानोड्डाणांची दुप्पट वाढ आमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत झालेली दुपटीने वाढ हे दर्शवते की, पुणे हे आता केवळ देशांतर्गतच नव्हे, तर जागतिक स्तरावर एक महत्त्वाचे केंद्र बनत आहे. पुणेकरांनी दाखवलेला हा विश्वास खूप मोलाचा आहे. या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी आम्ही विमानतळावरील सुविधांचा विस्तार आणि सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी कटिबद्ध आहोत.संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ