पुणे: केंद्र सरकारच्या हब अँड स्पोक मॉडेलअंतर्गत पुणे विमानतळ आता परदेशी प्रवाशांसाठी फीडर म्हणून कार्य करणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांची इमिग्रेशन आणि कस्टम्सची प्रक्रिया थेट पुणे विमानतळावरच पूर्ण होणार असून, दिल्लीतील विमानतळावर (हब) प्रवाशांना फक्त सिक्युरिटी चेकिंग करून परदेशात प्रवास करता येणार आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वरिष्ठ पथकाने यासंदर्भात नुकतीच पुणे विमानतळावर प्रत्यक्ष पाहणी पूर्ण केली. या प्रस्तावित व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक आणि पाहणी दौरा पार पडला.
यामध्ये नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, इमिग्रेशन विभाग, कस्टम्स विभाग आणि विविध विमान कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या बैठकीत हब अँड स्पोक मॉडेलची कार्यपद्धती, सुरक्षितता, प्रवासी सुविधा आणि आवश्यक तांत्रिक बदलांवर चर्चा झाली. त्यानंतर पथकाने विमानतळ परिसरातील प्रवासी प्रक्रिया क्षेत्र, टर्मिनल सुविधा आणि सुरक्षेची पाहणी केली.
प्रवाशांना होणारे प्रमुख फायदे
मुंबई किंवा दिल्लीसारख्या मुख्य हब विमानतळावर पोहचल्यानंतर तेथील इमिग्रेशन आणि कस्टम्सच्या लांब रांगांत उभे राहावे लागणार नाही.
पुण्याहून तपासणी पूर्ण झाली असल्यामुळे मुख्य विमानतळावरून पुढील कनेक्टिंग फ्लाइट पकडणे अधिक सोपे आणि जलद होईल.
या मॉडेलमुळे पुणे विमानतळाची क्षमता वाढणार असून, भविष्यात नवीन आंतरराष्ट्रीय मार्गांना आणि उड्डाणांना प्रोत्साहन मिळेल.
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. हब अँड स्पोक मॉडेलमुळे पुणे विमानतळावरील सुविधा अधिक सक्षम होणार आहेत. परदेशात उड्डाण करणाऱ्या प्रवाशांची इमिग्रेशन आणि कस्टम तपासणी पुणे विमानतळावरच पूर्ण होणार असल्याने मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळांवर (हब) त्यांचा वेळ वाचेल आणि प्रवाशांना विनाअडथळा परदेशात प्रवास करता येईल. यासंदर्भात मंत्रालय आणि संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेतला असून, पायाभूत सुविधांची पुणे विमानतळावर पाहणी केली आहे. लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल.संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ