पुणे: गल्फ देशात भडकलेल्या युद्धामुळे पुणे विमानतळावरील दुबई, अबू धाबीची आंतरराष्ट्रीय विमानसेवा, आंतरराष्ट्रीय मालवाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये येथून दुबई, अबू धाबी भागात प्रवास करणाऱ्या तब्बल दोन हजार प्रवाशांना फटका बसला आहे, तर पाच दिवसांमध्ये होणारी 4 ते 5 टन मालवाहतूक देखील थांबलेली आहे. यामुळे अनेकांचे पुढील नियोजन रखडले असून, आंतरराष्ट्रीय आयात-निर्यातीतील आर्थिक व्यवहाराला देखील फटका बसला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि मालवाहतूक (कार्गो) पूर्णपणे कोलमडली आहे. युद्धामुळे अबू धाबी आणि दुबई यांसारख्या महत्त्वाच्या शहरांची विमानसेवा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित केली आहे. याचा मोठा फटका आंतरराष्ट्रीय प्रवाशांना बसला असून, मालवाहतूकही अडकून पडली आहे.
पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी या परिस्थितीबाबत अधिकृत माहिती दिली आहे. त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, जोपर्यंत पुढील स्पष्ट आदेश येत नाहीत, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि मालवाहतूक सेवा बंदच राहतील. मालवाहतूक थांबल्याने व्यापाऱ्यांचे आणि निर्यातदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने दुबई आणि अबू धाबी या मार्गावरील सेवांवर मोठा परिणाम झाला आहे.
माल पुन्हा निर्यातदारांकडे?
पुण्यातून परदेशात विमानाने जाणाऱ्या मालामध्ये प्रामुख्याने ऑटोमोबाईल क्षेत्राचा मोठा वाटा आहे. यात ऑटो पार्टसची अधिक वाहतूक होते. एकूण आंतरराष्ट्रीय कार्गोमध्ये सर्वाधिक 70 टक्के वाटा हा ऑटो पार्टसचा आहे, तर नाशवंत वस्तू म्हणजेच फळे, भाजीपाला आणि अन्नपदार्थांचा वाटा 15 टक्के इतका आहे. याशिवाय इतर माल म्हणजेच किरकोळ आणि संकीर्ण वस्तू यांचा 15 टक्के वाटा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युद्धामुळे या देशांमध्ये पुण्यातून होणारी मालवाहतूक ठप्प झाल्याने माल पुन्हा निर्यातदारांकडे पाठवला जात असून, ऑटो पार्ट आणि संकीर्ण वस्तू परत पाठवल्यामुळे सध्या कोणतेही नुकसान होणार नसले तरी नाशवंत वस्तू म्हणजेच फळे, भाजीपाला आणि अन्नपदार्थ पुण्यातील शेतकरी निर्यातदारांकडे पुन्हा परत पाठवले जात असल्यामुळे त्यांचे नुकसान होण्याची मोठी शक्यता आहे.
आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पुढील आदेश येईपर्यंत अबू धाबी व दुबईकडे जाणारी आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि मालवाहतूक स्थगित करण्यात आली आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे. मात्र, नागरिकांनी अधिक माहितीसाठी आणि आपल्या तिकिटांच्या सद्यस्थितीसाठी संबंधित विमान कंपन्यांच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ