पुणे : विमान प्रवासाच्या बॅगेत गांजा सापडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आयटी इंजिनिअर तरूणावर विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. देशांतर्गत विमान प्रवासात बॅगची तपासणी होत नाही, या समजामुळे आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणाला मोठी किंमत मोजावी लागली आहे.
अमित जियालाल प्रजापती (वय २८, रा. गुलमोहर सिटी, खराडी रोड, मूळ रा. जगदिशपूर, ता. निजामाबाद, जि. आझमगड, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुजीत बालाजी कागणे (वय ३५, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ११ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता विमानतळावरील बॅग तपासणी केंद्रावर घडला.
अमित हा खराडी येथील आयटी कंपनीत कार्यरत असून तो उत्तर प्रदेशातील आपल्या गावी जाण्यासाठी विमानतळावर आला होता. बॅग तपासणीदरम्यान त्याच्या बॅगेत लायटर आढळून आले. कर्मचारी बॅगेतून लायटर काढत असताना त्यामध्ये दोन प्लास्टिकच्या पुड्या मिळाल्या. त्या गांजाच्या असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित प्रजापती हा एका आयटी कंपनीत कार्यरत आहे. तो पुणे ते वाराणसी या इंडिगो विमानाने प्रवास करत होता. त्याने आपली बॅग तपासणीसाठी विमानतळावर दिली होती. तपासणीदरम्यान मशीनमध्ये एका बॅगेत लायटर असल्याचे आढळून आले. त्यामुळे ही बॅग नाकारुन प्रत्यक्ष तपासणीसाठी वेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आली. तपासणीदरम्यान बॅगेत लायटरसह दोन प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये गांजा आढळून आला. वजन केले असता गांजाचे प्रमाण १२ ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. विमानतळ पोलिसांनी गांजा जप्त करून अमित प्रजापतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक माने पुढील तपास करीत आहेत.