

पुणे : पुणे शहर हे पुस्तकांची राजधानी व्हावे, अशी आपल्या सर्वांची मागणी आहे. पुढच्या वर्षासाठी पुस्तकांची राजधानी घोषित झाली आहे. त्यामुळे २०२७ मध्ये पुण्याला पुस्तकांची जागतिक राजधानी बनवण्याकरिता पुणेकरांनी पुढील आठ दिवस मोठ्या संख्येने भेट देऊन पुस्तकांची खरेदी करावी. पुढचा पुणे पुस्तक महोत्सव हा जागतिक पातळीवरील पुस्तक महोत्सव करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एकत्रित प्रयत्न करावे लागणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे शनिवारी थाटात उद्घाटन झाले. या वेळी मंत्री पाटील बोलत होते. याप्रसंगी 99 व्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील , केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह आनंद कटिकर, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, सामाजिक आणि शैक्षणिक कामात मदत करताना खर्चाचा विचार करायचा नसतो. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी १०० रुपयांचे कूपन देण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयांना पुस्तके खरेदी करण्यासाठी १० हजार रुपयांचे कूपन देण्यात येत आहे. मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आपण मराठी पुस्तके वाचायला हवी. मराठीत नाटके आणि सिनेमे पाहायला हवे. अशा पद्धतीने आपल्याला अभिजात मराठी भाषेला जगापुढे न्यायचे आहे. यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी सहकुटुंब भेट द्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले.
विश्वास पाटील म्हणाले, उत्तम ज्ञान मिळवायचे असल्यास ग्रंथाशिवय पर्याय नाही. ग्रंथ हे माणसाचे मित्र असून, ते शाळेत आणि महाविद्यालयात सोबत असतात. ग्रंथांचा पुस्तकांच्या वाचनातून आनंद घेणार असाल, तर तुमच्यासाठी स्वर्ग निर्माण होऊन, जीवनात सुखी होणार आहात. प्रत्येक भारतीय माणसाचा सहा तासांचा वेळ मोबाईलवर जात आहे, हे फार गंभीर आहे.
मोहोळ म्हणाले, गत दोन पुणे पुस्तक महोत्सवाच्या शेवटी होणारी गर्दी ही यंदा पहिल्याच दिवशी झाली. त्यामुळे पुणेकर या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहतात, हे स्पष्ट झाले. या पुस्तक महोत्सवाने स्वतःची ओळख बनवली आहे. पुणे शहर हे साहित्य, कला, संस्कृती याचे मानबिंदू आहे. महोत्सवात वाचकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. भविष्यात हा महोत्सव ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. काटीकर यांनी आभार मानले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर दिल्लीस्थित पराशर बँडने सादरीकरणातून नागरिकांची मने जिंकली.
महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी झालेली गर्दी ही अलोट आहे. गेल्या वर्षी हीच गर्दी शेवटच्या दिवशी झाली होती. त्यामुळे यंदाचा पुस्तक महोत्सव सर्व विक्रम मोडीत काढणार आहे. या पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य जनतेसमोर आणले आहे. पुढील पुणे पुस्तक महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावरील होणार आहे. सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर हे आगामी काळात पुस्तकांची राजधानी ओळखली जाईल. त्यासाठी आमच्या सर्वांचे प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली.