Pune International Airport Pudhari
पुणे

Pune Airport Narcotics Seizure: पुणे विमानतळावर ३ किलो २८ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त

ट्रॉली बॅगेतील गुप्त कप्प्यात लपवून आणला; २४ वर्षीय तरुणाला अटक, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बँकॉकहून पुण्यात आलेल्या २४ वर्षीय तरुणाच्या ट्रॉली बॅगमध्ये गुप्त कप्पा तयार करून आणलेला तब्बल ३ किलो २८ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा पुणे कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत १५ लाख रुपये, तर पुण्यातील बाजारात त्याची किंमत तब्बल एक कोटी रुपयांपर्यंत असल्याचे कस्टमने न्यायालयात सांगितले.

याप्रकरणी राहुल कुमार (वय २४, रा. दालनपूर, जि. पटियाला, पंजाब) याला अटक केली आहे. राहुल हा एअर इंडिया एक्स्प्रेसच्या आयएक्स-२४१ विमानाने १० सप्टेंबर रोजी बँकॉकहून पुण्यात आला होता. विमान सायंकाळी ५.५० वाजता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यानंतर त्याला पुण्याहून दिल्लीला जायचे होते. पुणे-दिल्ली प्रवासासाठी त्याची सीट २० बी होती. कस्टमच्या एआययूला राहुल बँकॉकहून हायड्रोपोनिक गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार विमानतळावर संशयित प्रवाशांच्या सामानावर लक्ष ठेवण्यात आले. राहुलच्या चेक-इन ट्रॉली बॅगची तपासणी करताना बॅगचा एक भाग असामान्यरीत्या जड असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. बॅगच्या आतील अस्तर काढून तपासणी केली असता त्यामध्ये गुप्त कप्पा तयार केल्याचे आढळले. या कप्प्यात काळ्या रंगाच्या तीन व्हॅक्यूम सीलबंद पिशव्या लपवून ठेवलेल्या होत्या.

त्या पिशव्या उघडून पाहिल्या असता त्यामध्ये हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे वजन ३ किलो २८ ग्रॅम भरले. ही कारवाई १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजता सुरू झाली. तपासणी आणि चौकशीची प्रक्रिया ११ सप्टेंबरच्या पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होती. ही कारवाई कस्टम विभागाचे कमिशनर अनिल डी. आणि उपायुक्त धीरज मोरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. एआययूचे अधीक्षक अभिजित भिसे, निरीक्षक विजय कुमार, निरीक्षक महेंद्र पांचाळ यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कोट्यवधींच्या हायड्रोपोनिक गांजा तस्‍करीप्रकरणी आरोपीला अटक करून शुक्रवारी पुण्यातील विशेष एनडीपीएस न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी विशेष सरकारी वकील ऋषिराज वाळवेकर यांनी युक्‍तिवाद केला. न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT