पुणे: गुंतवणूकदारांची ८८ कोटी रुपयांची फसवणूक करून परदेशात पसार झालेल्या आरोपीचे प्रत्यार्पण करण्यात आले. मुंबई विमानतळावर आरोपी उतरल्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली. अविनाश अर्जुन राठोड (रा. आनंदबन सोसायटी, रावेत) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, त्याची पत्नी कॅनडात पसार झाली आहे.
बाणेर परिसरात अविनाश राठोड आणि त्याची पत्नी विशाखा यांनी एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी ही कंपनी सुरू केली होती. राठोड दाम्पत्याने गुंतवणूकदारांना 'एपीएस हेल्थी व्हेंचर्स एलएलपी' या कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा पाच टक्के मुद्दल व पाच टक्के नफा देऊन अवघ्या २० महिन्यांत रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले होते. राठोड दाम्पत्याने सुरुवातीला गुंतवणूकादरांना परतावा दिला. त्यानंतर त्यांनी परतावा देण्याचे थांबविले. परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात २० एप्रिल २०२३ रोजी तक्रार दिली. या तक्रारीवरून राठोड दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर अविनाश आणि त्याची पत्नी विशाखा हे पसार झाले.
राठोड दाम्पत्य पसार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आर्थिक गु्न्हे शाखेने न्यायालयात दोघांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले. राठोड दाम्पत्य परदेशात पसार होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी रेड काॅर्नर नोटीस बजाविली. विशेष न्यायालयात राठोड दाम्पत्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त आयुक्त तेजस्वी सातपुते, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांंच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेण्यासाठी कारवाई सुरू केली. राठोड हा परदेशात पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली. तो सध्या दुबईत वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला देशात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले. राठोड याचे प्रत्यार्पण करण्यात आले. मुंबई विमानतळावर तो उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
फरार आरोपींना परत आणण्यासाठी मोहीम
आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातील परदेशात पळून गेलेल्या सर्व आरोपींना कायदेशीर प्रक्रियेद्वारे भारतात परत आणण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असून, संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.