

पुणे: शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारीदरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात होणार आहे. साहित्य संमेलनासाठी बोधचिन्ह स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
बोधचिन्ह पाठविण्यासाठी ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत असून या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बोधचिन्हास ५१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच, स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
पुणे हे विद्येचे माहेरघर, इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेले शहर आणि आधुनिकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे बोधचिन्हामध्ये पुण्याचा ऐतिहासिक वारसा, मराठी साहित्याची समृद्ध परंपरा, महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि आधुनिकतेचा वेध यांचा सुरेख संगम अपेक्षित आहे.
तसेच, संमेलनाचे शताब्दी वर्ष डिझाईनमधून ठळकपणे प्रतिबिंबित होणे आवश्यक आहे. ही स्पर्धा भारतातील सर्व कलाकार, डिझायनर्स, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी खुली आहे. बोधचिन्हासमवेत १०० ते १५० शब्दांचे मराठी भाषेतील संकल्पना स्पष्टीकरण जोडणे आवश्यक आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी shatabdilogo@sahityaparishad.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.