पुणे: मृत्यू प्रत्येकाचा अटळ असतो; पण प्रत्येकाच्या वाट्याला मृत्यूनंतर आपलेपणाचा निरोप येतोच असे नाही. कुणाच्या पार्थिवाजवळ अश्रू ढाळणारे नातेवाईक असतात, तर कुणाच्या अंत्यसंस्कारांना चार माणसेही उपस्थित नसतात. काहींच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठीही कोणी पुढे येत नाही. आयुष्यभर कोणत्या वेदना सोसल्या, कोणत्या आठवणी मनात जपल्या आणि कोणत्या परिस्थितीत अखेरचा श्वास घेतला, याची उत्तरे कायमची अनुत्तरित राहतात. अशा अनामिक आयुष्यांना मृत्यूनंतर तरी सन्मान मिळावा, त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, या भावनेतून पुण्यातील राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महापालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाने माणुसकीची परंपरा जपली आहे.
सर्वपित्री अमावास्येच्या निमित्ताने यंदा ८२ बेवारस मृतांच्या अस्थींचे संगम घाटावर विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आले. कैलास स्मशानभूमीत बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या मृतांच्या अस्थी संकलित करून त्यांचे धार्मिक विधींनुसार विसर्जन करण्यात आले. ज्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही, त्यांच्यासाठी समाजातील काही संवेदनशील माणसे पुढे आली. त्यामुळे या उपक्रमातून केवळ धार्मिक विधी पार पडला नाही, तर माणुसकीचा एक हळवा धागाही जपला गेला.
पुणे शहरात बेवारस अवस्थेत मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. मात्र, अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी कोणी नातेवाईक किंवा परिचित पुढे आले नाहीत, तर त्या अस्थी तिथेच राहतात. हिंदू धर्मात मृत्यूनंतर अस्थींचे विसर्जन करण्याला धार्मिक महत्त्व आहे. याच भावनेतून या अस्थींचे संकलन करून सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी त्यांचे विधिवत पूजन आणि विसर्जन केले जाते. यंदा ८२ मृतांच्या अस्थींचे संगम घाटावर विसर्जन करण्यात आले. प्रत्येक अस्थिकलशामागे एक आयुष्य होते. कोणाच्या आयुष्यात कधी सुखाचे क्षण आले असतील, कोणाला आपल्या माणसांची ओढ लागली असेल, तर कुणाच्या वाट्याला एकाकीपणाचे दुःख आले असेल. मात्र, मृत्यूनंतर या व्यक्तींची ओळख सांगणारे किंवा त्यांच्या आठवणी जपणारे कोणी नसले, तरी त्यांना सन्मानाने अखेरचा निरोप देताना उपस्थित सर्व जण भावूक झाले होते.
१६ वर्षांपासून माणुसकीची ज्योत
राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महापालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम गेल्या १६ वर्षांपासून राबवला जात आहे. पूर्वी दर महिन्याच्या अमावस्येला अस्थिविसर्जन केले जात होते. मात्र, काही काळ या उपक्रमात खंड पडला. आता पुन्हा हा उपक्रम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वपित्री अमावास्येला दिवंगत पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विधी केले जातात. याच दिवशी ज्यांच्यासाठी श्राद्ध करणारे किंवा अस्थींचे विसर्जन करणारे कोणी नाही, अशा मृत व्यक्तींच्या अस्थींचे विसर्जन करण्यामागेही श्रद्धेची आणि माणुसकीची भावना आहे.
बेवारस मृतांच्या अस्थींचे विसर्जन करणे ही केवळ धार्मिक परंपरा नसून, त्यांना मृत्यूनंतरही सन्मान मिळावा, ही आमची भावना आहे. हिंदू धर्मात अस्थिविसर्जनाला विशेष महत्त्व आहे. कोणाचा वारस असो वा नसो, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने अखेरचा निरोप मिळायला हवा. याच उद्देशाने राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महापालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १६ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे.मंदार रांझेकर, राष्ट्रीय कला अकादमी
बेवारस मृत व्यक्तींच्या अस्थींचे विसर्जन करून त्यांना सन्मानाने अखेरचा निरोप देणे, ही सामाजिक बांधिलकी आहे. ज्यांच्या अंत्यविधीसाठी किंवा अस्थिविसर्जनासाठी कोणीही पुढे येत नाही, अशा व्यक्तींनाही मृत्यूनंतर सन्मान मिळावा, या भावनेतून हा उपक्रम राबवला जात आहे.भास्कर महाडीक, सहायक उपायुक्त, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय महापालिका