पुणे : ससूनमधून वृद्धाश्रमात दाखल केलेल्या बेवारस वृद्धांना मोकळ्या मैदानात ठेवल्याचे आणि त्यापैकी प्रकाश पुरोहित या रुग्णाचा ठावठिकाणा लागत नसल्याच्या प्रकरणाने पुण्यात गुरुवारी खळबळ माजली. अधिक चौकशीमध्ये 7 मार्च रोजी प्रकाश पुरोहित यांचा ससूनमध्ये मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत शासनाच्या त्रिसदस्यीय समितीने शुक्रवारी ससून रुग्णालयात तब्बल सात तास चौकशी केली. यामध्ये 16 ते 20 जणांचे जबाब नोंदवले गेले. चौकशी अहवाल सोमवारपर्यंत शासनाला सादर केला जाणार आहे.
‘आस्क’ वृद्धाश्रमाच्या दादासाहेब गायकवाड यांनी प्रकाश पुरोहित या रुग्णाला फेबुवारी महिन्यात ससून रुग्णालयात पुन्हा दाखल केल्याचा दावा केला होता. ससूनमधील नोंदी तपासल्यानंतर 12 फेबुवारी रोजी गायकवाड याने त्याच रुग्णाला अनोळखी बेवारस व्यक्ती म्हणून ससूनमध्ये दाखल केल्याचे समोर आले.
समितीने केलेल्या चौकशीनंतर प्रकाश पुरोहित यांची जबाबदारी टाळण्यासाठी त्यांना अनोळखी म्हणून दाखल केल्याचे समोर आले. प्रकाश पुरोहित यांचा 7 मार्च रोजी ससूनमध्ये मृत्यू झाला. याबाबतची सखोल चौकशी समितीतर्फे करण्यात आली.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शासनाच्या नियमांच्या निकषांचे पालन करत आमच्या समितीने ससून रुग्णालयात बेवारस रुग्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली. यासंदर्भात ससून रुग्णालयात 16-17 जणांचे जबाब नोंदवण्यात आले. याबाबतचा अहवाल सोमवारपर्यंत शासनाला सादर केला जाईल. त्यामध्ये रुग्णाबाबत सर्व माहिती नोंदवण्यात आली आहे.डॉ. पल्लवी सापळे, अध्यक्ष, चौकशी समितीb