

श्रीरामपूर : गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. बिबट्या जेरबंद करण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरेही लावले आहेत. एकलहरे शिवारातही पिंजरा लावला होता. यात एक कुत्राही ठेवला होता. मात्र, बिबट्याने मोठ्या शिताफीने पिंजऱ्यातूनही कुत्रा पळवल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत वाढली आहे. आता त्याच पिंजऱ्यात शेळी बंदिस्त करून ठेवण्यात आली आहे.
एकलहरे कार्यक्षेत्रात, तीन बिबट्या व दोन बछड्यांचा वावर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिवसभर उसाच्या शेतात लपून राहिल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास बिबट्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामस्थांना आपले दर्शन देत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळेस गस्त घालणे सुरू केले असून, एकलहरे ग्रामपंचायतीने तात्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाने तातडीने बिबट्याच्या वावराच्या ठिकाणी पिंजरा बसवला आहे.
परिसरातील सादिक भाई वस्ती व गिरमे वस्ती जवळ सलग आठ दिवसांपासून बिबट्या रात्रीच्या वेळेस येत आहे आणि पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहे. दरम्यान, पिंजऱ्यातून कुत्रा पळवल्याने या घटनेची माहिती सरपंच अनिस शेख यांनी वनविभागाला दिली. वन विभागाचे अक्षय बडे घटनास्थळी येऊन पाहणी केली, यावेळी तांत्रिक अडचण आल्याने पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला नसावा, असा अंदाज काढला गेला.
अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या, शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य नागरिकांना नाकी नऊ आणून, पाळीव प्राणी शेळ्या, मेंढ्या, कुत्र्यांना फस्त करणारा बिबट्या कधी जेरबंद होतो, याकडे एकलहरे परिसरातील नागरिक बारकाईने लक्ष लावून आहेत.
यावेळी सेवा सोसायटीचे अध्यक्ष अन्सारभाई शेख, ज्येष्ठ पत्रकार लालमोहमद जहागीरदार, सरपंच पती अनिस शेख, माजी उपसरपंच रमेश कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते विलासराव ठोंबरे, सादिक शेख, अरुण जाधव, गुलाब शेख, अब्दुल्ला शेख, मलिक शेख, आदेश गिरमे, आकाश गिरमे, अक्षय ठोंबरे, मयूर गिरमे, तेजस जंबे, साहिल पठाण सह रिजवान जहागीरदार आदींनी पिंजऱ्याचे नियोजन लावले
तालुक्याच्या अनेक भागात बिबट्यांचा वावर आहे. यात, हरीगाव शिवारातही बिबट्याने दशहत निर्माण केल्याने, नागरिक, महिला, मजूर, विद्यार्थीसुद्धा भयभीत झाले आहे. याबाबत अनेक वेळा सांगूनही हरीगाव कारखाना परिसरात वनविभागाने पिंजरा लावला नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सध्या हरीगाव साखर कारखाना बंद असल्याने तेथील पिठाच्या गिरण्या कारखान्याजवळ बिबट्याने आश्रय घेतला आहे. नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे याच ठिकाणी वारंवार बिबट्या पाहायला मिळतात. त्यांची पिल्ले सुद्धा त्या ठिकाणी असावीत, असा अंदाज बांधला जात आहे. दररोज पहाटे व संध्याकाळी बिबटे हे बिनधास्त फिरताना दिसतात. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिठाच्या गिरणीजवळ पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सुभाष पंडित, राजेंद्र मगर, समाधान वाहुळ, नाना खरात, विजय उबाळे, सुनील शिनगारे, अशोक बोधक, तेजस भालेराव आदींनी केली आहे.