Porsche Accident Pudhari
पुणे

Porsche Accident Blood Sample Case: पोर्शे अपघात प्रकरण: डॉ. अजय तावरे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

रक्तनमुना फेरफार प्रकरणात अटींसह दिलासा; साक्षीदारांशी संपर्क न ठेवण्याचे न्यायालयाचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कल्याणीनगर येथील बहुचर्चित पोर्शे अपघात आणि त्यानंतर उघडकीस आलेल्या रक्तनमुना फेरफार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ससून रुग्णालयाचा माजी फॉरेन्सिक विभागप्रमुख डॉ. अजय तावरे याला शुक्रवारी अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे. 19 मे 2024 रोजी घडलेल्या कल्याणीनगर येथील बहुचर्चित पोर्शे अपघात प्रकरणात रक्तनमुने बदलल्याचा प्रकार तपासात समोर आला आहे.

अल्पवयीन चालकाच्या रक्तातील मद्याचे पुरावे लपवण्यासाठी संगनमत केल्याचा दावा पोलिसांनी केला. याच प्रकरणात ससून रुग्णालयातील काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नावे समोर आली, त्यात डॉ. अजय तावरे याचा देखील सहभाग पोलिस तपासात समोर आले. जुलै 2024 मध्ये पुणे पोलिसांनी सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यात अपघातानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी कथितपणे रचलेल्या कटाची माहिती देण्यात आली. मध्यस्थांमार्फत डॉक्टरांशी संपर्क साधून रक्तनमुने बदलण्यात आल्याचा आरोप तपासात नमूद करण्यात आला.

डॉ. अजय तावरे याच्यावरही या कथित कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला. तपास यंत्रणेनुसार, तो संबंधित दिवशी रजेवर असला तरी संगनमतात त्यांची भूमिका असल्याचे म्हटले गेले. त्याला मे 2024 मध्ये अटक करण्यात आली होती आणि ते तेव्हापासून न्यायालयीन कोठडीत होता.

‌‘समता तत्त्वा‌’वर जामीन (पॅरिटी)

डॉ. तावरे याने जामिनासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर 2025 मध्ये फेटाळला होता. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या वतीने मांडण्यात आले की, या प्रकरणातील इतर काही सहआरोपींना आधीच जामीन मंजूर झाला आहे आणि ते जवळपास एकवीस महिने तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंची बाजू ऐकून ‌‘समता तत्त्वा‌’चा आधार घेत त्याला जामीन देण्यात आला.

डॉ. तावरे याला जामीन देताना घातलेल्या अटी

डॉ. तावरे याने खटल्यात पूर्ण सहकार्य करावे, साक्षीदारांशी कोणताही संपर्क साधू नये आणि जामिनाच्या अटींचा गैरवापर करू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अटींचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द होईल, असेही आदेशात नमूद आहे.

जामीन मिळालेले आरोपी

डॉ. अजय तावरे, अमर गायकवाड (मध्यस्थ), आशपाक मकानदार (मध्यस्थ), मागील सीटवर बसलेला अल्पवयीन, आशिष मित्तल, शिवानी अग््रावाल, अल्पवयीन चालक

अद्याप कारागृहात असलेले आरोपी

विशाल अग््रावाल (बिल्डर), ससून रुग्णालयातील डॉ. श्रीहरी हळनोर, ससूनमधील शिपाई अतुल घटकांबळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT