

पुणे / वाघोली: कायद्याने बंदी असताना देखील मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंगनिदान चाचणी करणाऱ्या डॉक्टरसह एजंटला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. आकाश सुभाष मलगुंडे (वय 35 रा. ढोकसांगवी ता. शिरूर जि. पुणे) व एजंट नरेंद्र साहेबराव ठाकरे (वय 52 रा. केसनंद ता. हवेली, जि, पुणे) अशी त्यांची नावे असून, त्याच्याविरोधात वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शिरूर तालुक्यातील पाचंगेवस्ती, ढोकसांगवी येथील लाईफ केअर रुग्णालयामध्ये बुधवारी (दि.4) ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत गर्भलिंगनिदानासाठी वापरण्यात येणारे साहित्य, औषधे व वाहनासह सुमारे 7 लाख 73 हजार 75 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना याबाबत एकाने माहिती दिली होती. वाघोली परिसरातील एक एजंट महिलांची बेकायदा गर्भलिंगनिदान चाचणी करत होता. अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट सातचे पोलिस निरीक्षक संतोष सोनावणे, शिरूर ग््राामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन धस आणि पंचाचे एक पथक तयार करण्यात आले. सापळा तयार करून या सर्वांचे पथक बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एजंट ठाकरे याने दिलेल्या रुग्णालयाच्या पत्त्यावर बनावट पेशंटसह निघाले.
कारेगाव रांजणगाव औद्योगिक वसाहत येथे पोहचले असता तिथे एजंट ठाकरे याने बनावट पेशंट आणि तिच्या पतीला आपल्या खासगी चारचाकी गाडीत बसविले. त्यानंतर तो त्यांना घेऊन पाचंगेवस्ती, ढोकसांगवी येथील लाईफ केअर नावाच्या रुग्णालयात दाखल झाला. पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी आणि पंचांना सोबत घेऊन त्या रुग्णालयात छापा टाकला. या वेळी डॉ. आकाश मालगुंडे हा बनावट पेशंट महिलेची छोट्या प्रोबने मोबाईलला वायफायच्या साह्याने जोडून ॲपद्वारे सोनोग््रााफी करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या वेळी त्याच्यासोबत एजंट ठाकरेदेखील होता. मालगुंडे याने वैद्यकीय क्षेत्रातील बी.ए.एम.एस.ची पदवी घेतली आहे.
दरम्यान, पोलिसांनी या दोघांना हॉस्पिटलमधून आपल्या ताब्यात घेऊन हॉस्पिटल आणि एजंटच्या गाडीची तपासणी केली. त्या वेळी गाडीमध्ये गर्भलिंगनिदान चाचणी करण्याचे साहित्य तसेच गर्भपात करण्यासाठी आवश्यक असणारी औषधे आढळली. पोलिस दोन्ही आरोपींना वाघोली पोलिस ठाण्यात घेऊन आले. आरोपी दहा ते वीस हजार रुपयांमध्ये ही चाचणी करत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनावणे यांच्या पथकाने आरोग्यसेवा, पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या सहकार्याने ही कारवाई केली.
अशा प्रकारांची माहिती तातडीने कळवा
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आरोपी लहान व सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येणाऱ्या सोनोग््रााफी मशिनचा वापर करत होते. हे मशिन मोबाईलशी जोडून ॲपच्या माध्यमातून गर्भलिंगनिदान केले जात होते. ही कारवाई पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गर्भलिंगनिदान करणे किंवा करून घेणे हा कायद्याने गंभीर व दंडनीय गुन्हा असून, अशा प्रकारांची माहिती मिळाल्यास तातडीने आरोग्य विभाग किंवा पोलिस प्रशासनाला कळवावी, असे आवाहन डॉ. यमपल्ले यांनी केले आहे.