पुणे: अनियंत्रित शहरीकरण आणि वाहनांच्या वाढत्या धुरामुळे प्रदूषणाची समस्या देशासाठी एक गंभीर आरोग्य संकट बनले आहे. दिल्लीमध्ये काही आठवड्यांपासून ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ 400 हून अधिक नोंदवण्यात आला असून, तो ‘गंभीर’ श्रेणीत मोडतो.
गेल्या काही दिवसांत शहरातील ‘एक्यूआय’ सातत्याने 200 च्या वर गेला असून, तो ‘खराब’ श्रेणीमध्ये मोडत आहे. त्या अनुषंगाने दीर्घकालीन प्रदूषण हे गर्भवती महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
महानगरांमध्ये त्यातही पुण्यातील वाढत्या प्रदूषणाचा गर्भवती महिलांवर आणि मुलांवर अतिशय घातक परिणाम होत आहे. दूषित हवेमुळे मुलांना घरघर, श्वास घेण्यास त्रास आणि दमा होण्याचा धोका वाढतो. याशिवाय पुण्यातील विषारी हवा गर्भवती महिलांसाठीही गंभीर श्वसनासंबंधी अडचणी निर्माण करू शकते.
गर्भवती महिलांवरील प्रदूषणाचे दुष्परिणाम
गर्भपात, मृतजन्म आणि अकाली प्रसूतीचा वाढलेला धोका
बाळाचे कमी वजन आणि गर्भाच्या वाढीमध्ये मर्यादा
उच्च रक्तदाब, गर्भावस्थेतील मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका
प्लासेंटाचे नुकसान आणि बाळाकडे जाणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यात घट
प्रदूषणाचे मुलांवरील दुष्परिणाम
दमा, न्युमोनिया यासारखे श्वसनाचे गंभीर त्रास.
ॲलर्जी आणि शिकण्यात अडचणी येण्याचा धोका.
फुप्फुसांची वाढ खुंटणे आणि क्षमता कमी होणे.
संसर्ग आणि आजारांची लागण होण्याची शक्यता.
‘एअर प्युरिफायर’ आणि ’एन 95’ मास्कचा वापर करा. प्रचंड प्रदूषणाच्या वेळी घरातील खिडक्या बंद ठेवा. अँटिऑक्सिडंटयुक्त आहार घ्या आणि पुरेसे पाणी प्या. प्रदूषणाची पातळी अधिक असताना घराबाहेर पडणे टाळा. ही काळजी वेळेवर घेतली तर प्रदूषणामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्य धोक्यांपासून बचाव करता येऊ शकतो.डॉ. जयंत खंदारे, पेडियाट्रिक्स आणि निओनेटोलॉजी सल्लागार