निमोणे: सगळ्या डगरीवर पाय ठेवून वावरणाऱ्या इरसाल माणसांना निवडणुकीच्या काळात मोठी तारेवरची कसरत करावी लागते, जुन्या काळात गावगाड्यात फक्त गावापुरतं उभं - आडवं कसंही वागलं तरी मतलब साधून जात होता. मात्र, सध्याच्या काळात कोणीच स्वतःला गावापुरतं सीमित करायला तयार नाही.
कधीकाळी गावगाड्यातील एखाद्या माणसाला तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा प्रमुख नेता नावानिशी ओळखायचा. पण, आजच्या घडीला कोणत्याही गावात गेलं तर थेट राज्याच्या प्रमुखापासून निम्मे मंत्रिमंडळापर्यंत दहा- पाच लोकांच्या तरी सोशल मीडियावर भागाच्या विकासावर चर्चा करताना अशा पद्धतीचे फोटो झळकलेले आपल्याला पाहायला मिळतात. काय चर्चा केली ही त्यांची त्यांना माहीत, टॉपची लीडरशिप मग ती कोणत्याही पक्षाची असो सगळ्यांबरोबर फोटो काढून आम्ही तुमचेच या तोऱ्यात वावरणारी माणसं सगळे डगरीवर हात ठेवून आम्ही वरवर कुणाबरोबरही राहू.. पण मनाने मात्र तुमच्या बरोबरच! हे पटवून देण्याचं कसब यांच्याकडे असतं हे मात्र नक्की.
या इरसाल माणसांच्या निष्ठा या फक्त स्वार्थाशी निगडित असतात. आपली खूप ओळख आहे, गावगाड्यात आपल्याला मोठे समजावे यासाठी जिथे जमेल तिथं एखादा आमदार, एखादा खासदार किंवा मंत्री दिसला की त्याच्याबरोबर फोटो काढून ही मंडळी सोशल मीडियावर भागाच्या विकासासाठी मान्यवरांशी सखोल चर्चा करताना या पद्धतीची पोस्ट व्हायरल करणार म्हणजे करणार, बरं या मंडळींना पक्षाचं काही सोयर-सुतक नसतं. एखादा राजकीय नेता प्रसिद्धीच्या शिखरावर आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला मोबाईलच्या कॅमेऱ्यात
छबी टिपता येते याची काय एकदा यांना जाणीव झाली की, ही मंडळी कितीही गर्दी असो, दाटीवाटीने छबी टिपणार म्हणजे टिपणार.... गावगाड्यापासून तालुक्याच्या कोणत्याही निवडणुकीत दोन-चार जणांना तरी आता तुम्ही माघार घेऊन नका, सगळ्या बाजूने आम्ही तुमच्या बाजूने आहे, वरवर आम्हाला कुणाबरोबरही फिरावं लागलं तरी अंत:करणापासून तुम्हीच निवडून यावे यासाठी आमचं काळीज तीळ तीळ तुटतंय. तुमच्यासाठी सगळ्या बाजूने मी ’फिल्डिंग’ लावून आहे, उभ्या- आडव्या तालुक्यात सगळ्या बाजूने माझा जनसंपर्क मोठा आहे.
गाव आणि गट हा लय किरकोळ विषय आहे. तुम्ही निर्धास्त रहा, माझ्या बाजूने आतून काम चालू आहे, तुम्ही मात्र कच खाऊ नका. निवडणुकीसाठी जी काही आयुधं लागतात त्याची तजवीज करा, निर्णायक क्षणी मी सांगतो ते करा, गुलाल आपलाच अशा पद्धतीने अनेक इरसाल माणसं गावगाड्यापासून तालुक्याच्या राजकीय पटावर स्वतःच्या कौशल्याचे मार्केटिंग करून आपल्या नावाचा खुंटा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.