Political Activism Satire Pudhari
पुणे

Political Activism Satire: जनहिताची कळकळ आणि राजकीय कार्यकर्त्यांची गंमत

नगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने उघड होणारी नव्या पिढीच्या राजकारणातील उपरोधिक वास्तव

पुढारी वृत्तसेवा

सुनील माळी

“या कार्यकर्त्यांची जनहिताची कळकळ पाहून मला अगदी भरून येतंय, राजाभाऊ...”

“का हो ? अशी काय कळकळ दाखवली या कार्यकर्त्यांनी की ज्यामुळं अगदी तुम्हाला भरून-बिरून आलंय... ?”

“अहो, हे आजकालचे राजकीय कार्यकर्ते खूपच आदर्श आहेत आणि त्यांना जनहिताची प्रचंड कळकळ, तळमळ लागलेली आहे, असं माझं मत झालंय बाबा... तुम्ही सगळे लोक उगीच या नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांवर आगपाखड करता..., अगदी जुन्या तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्यांचीच आठवण मला येते. त्यांचा वारसा ही मंडळी चालवताहेत, अगदी तंतोतंत...”

“अरे बापरे..., एवढं काय चांगलं दिसलं या नव्या कार्यकर्त्यांत तुम्हाला गजाभाऊ ?”

“राजाभाऊ, तुम्ही पाहिलंत ना टीव्हीवर आणि टीव्हीवर तरी कशाला ? आपल्याच गावच्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये कँडिडेट्‌‍स डिक्लेअर झाले तेव्हा ?”

“काय पाहायचं त्यात ? तुम्ही काय पाहिलं त्यात ?”

“हेच म्हणतो मी नेहमी. तुम्ही कायम नव्या पिढीवर टीकाच करत बसा. तुम्हाला त्यांच्यातलं चांगलं काहीच दिसत नाही... अहो, उलगडून सांगतो तुम्हाला. त्या सगळ्या पार्ट्यांच्या तिकिटासाठी किती झुंबड उडाली तुम्ही पाहिलीत ना ? या सगळ्यांना आपापल्या पार्टीचं तिकीट हवंय..., तिकीट का हवंय ? तर इलेक्शन लढण्यासाठी. इलेक्शन का लढवायचीये ? तर निवडून येण्यासाठी आणि निवडून का यायचंय ? तर लोकांची कामं करण्यासाठी, शहराचा विकास करण्यासाठी. शहर विकास आपल्याच हातनं व्हावा, आपण या शहराला आकार द्यावा, असं यांना वाटतंय.”

“अच्छा, अच्छा... म्हणजे ही सगळी गडबड अन्‌‍ हा सगळा खटाटोप चाललाय तो आपल्याला विकास करता यावा, यासाठी ?...”

“हो तर... अहो, शहरनिर्माणाची संधी आपल्याला मिळणार, या आशेनं ते हे सगळं करताहेत, पण त्यातल्या काहींना तिकीट मिळाल्यानंतर तिकीट हवं असणाऱ्या इतरांच्या या आशेवर पाणी पडलं आणि लोकांच्या कामी आपण येणार नाही, या कल्पनेनं त्यांना रडूही कोसळलं... टीव्हीवर पाहिलं ना तु्‌‍म्ही, त्या भगिनी कशा धाय मोकलून रडत होत्या अन्‌‍ म्हणत होत्या, माझं काय चुकलं, मी कुठं कमी पडले, ते मला सांगा...? अगदी राहावत नव्हतं ते पाहून.”

“आता माझ्या लक्षात यायला लागलंय. शहरविकासाची कोण आच ? शहराचं भलं व्हावं आणि ते आपल्याच हातून व्हावं, याची कोण काळजी यांना ? आपल्याला लोकांच्या उपयोगी पडता येणार नाही, हे कळल्यावर त्यांना अश्रू दाटून येत होते... आणि आपल्या भगिनीच कशाला तर आपले लोकहितवादी बांधवही तसेच. अर्थात, भावना व्यक्त करण्याची त्यांची पद्धत महिला वर्गासारखी अश्रू-बिश्रू ढाळण्यासारखी निश्चितच नसणार. त्यांनी पार्टी ऑफिसच्या काचा फोडल्या, थोड्या ग््रााम्य भाषेत आपला सात्त्विक संताप व्यक्त केला. ‌‘नेत्यांनी पैशे-बिशै घेऊन ठरावीक लोकांनाच तिकिटं दिली‌’, असा थेट आरोपच काहींनी केला. त्यांच्या त्या भाषेबद्दल अ्‌‍न थोड्याशा तोडफोडीबद्दल त्यांना माफच केलं पाहिजे. त्यांची समाजसेवेची संधी हिरावली गेली होती ना ?...”

“मग ? बरोबरच आहे. आता ज्यांना तिकिटं मिळाली त्यांनी आपलं तिकीट कसं सेलिबेट केलं तेही पाहा ना. त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके-बिटाके उडवले, गुलालानं आपल्या नेत्याला अन्‌‍ त्याच्या शेजारी असलेल्या सगळ्यांना एवढं माखून काढलं की त्यातला उमेदवार कोण ?, ते बराच वेळ ओळखूच येत नव्हतं... त्या इच्छुकाचं रूपांतर उमेदवारात झालं होतं. सुरवंटाचं फुलपाखरू कसं होतं ? तसंच. त्यामुळं त्याची वागणूक एकदमच बदलली. गल्लीत फिरताना जो गुरकावत फिरत होता, तो आता जो दिसेल त्याच्या पाया पडत चाललायं..”

“बरोबरच आहे, पडणारच पाया. त्याला आता समाजसेवेची, लोकांसाठी काम करायची संधी मिळालीये ना ? त्याला आता असं झालं असणार की कधी एकदा नगरसेवकपदाची माळ आपल्या गळ्यात पडतेय अन्‌‍ आपण कॉर्पोरेशनमध्ये जातोय ?... कॉर्पोरेशनमध्ये जायची, तिथल्या मिटिंगांना हजर राहायची, लोकांच्या उपयोगी पडणाऱ्या कामांच्या टेंडरांना मान्यता द्यायची त्यांना आता घाई झाली असणार. जेवढ्या मोठ्या रकमेचं टेंडर तेवढा त्याला वाटणारा आनंद मोठा, कारण जेवढं मोठं काम तेवढं ते अधिक लोकांच्या उपयोगी पडणारं असणार...”

“खरंय. या नव्या पिढीला जनहिताची खूपच काळजी आहे, त्यांच्या हाती आपल्या पुण्याचं भवितव्य सुरक्षित आहे... चला, आपल्या कँडिडेटच्या प्रचाराचा नारळ आहे आपल्या चौकात... आपणही जाऊयात...”

“चला चला...”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT