बारामती; पुढारी वृत्तसेवा: आता आधुनिक ॲप द्वारे पोलिसांना आरोपीच्या घरापर्यंत पोचण्यास मदत होणार आहे. पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून तयार करण्यात आलेल्या आधुनिक ॲप (सीएमआयएस ) स्पॉटवेअर हस्तांतरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.
या वेळी अजित पवार म्हणाले की, राज्यात महिला, युवतींबाबत घडणारे गैरप्रकार चिंतेची बाब आहे. राज्य शासन त्याबाबत निश्चित उपाययोजना करेन. येत्या काळात शक्ती कायदा पारित केला जाईल. पोलिस खात्याने सामान्य जनतेला आधार वाटावा व गुंडांवर जरब बसावी असे काम केले पाहिजे. चुकीचे काम कोणी करत असेल मग तो माझ्या जवळचा का असेना, त्याच्यावर नियमानुसार कारवाई झालीच पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोज लोहिया, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, सोलापूरच्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधिक्षक अतुल झेंडे, मिलिंद मोहिते, विवेक पाटील, मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, आय मार्क टेक्नाॅलाजीचे संचालक मंगेश शितोळे आदी उपस्थित होते.
पवार यांनी यावेळी पोलिसांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याबद्दल कौतुक केले.
ते म्हणाले, राज्यात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, ही दुदैवी बाब म्हणावी लागेल. त्यासाठी पेट्रोलिंग वाढविण्यासह अन्य उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत याबाबत नुकतीच आमची बैठक पार पडली. त्यात विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलिस दलाला मोठी शौर्याची परंपरा आहे. ती जपली पाहिजे. चुकीचे वागता कामा नये. सामान्यांना आधार तर गुंडांना जरब बसली पाहिजे असे काम पोलिसांकडून अपेक्षित आहे.
चुकीचे काम करणारा माझ्याजवळचा असला तरी नियमानुसार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. पुणे व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी विकसित केलेले हे सॉप्टवेअर राज्यभर वापरात आणले जाईल अशी पवार यांनी दिली.
पोलिस दल तणावमुक्त राहण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. परंतु कायदा व सुव्यवस्थेत कुठेही तडतोड नको.
म्हाडा व अन्य संस्थांची घरे पोलिसांना मिळावीत यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
येत्या सणासुदीच्या काळात प्रत्येकाने मास्क वापरलाच पाहिजे यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत.
कोरोना काळात रस्त्यावर उभे राहत चांगले काम करणाऱया पोलिस दलाचे अजित पवारांनी कौतुक केले.
गुंडांकडून जनतेला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या, गुन्हेगारी मोडून काढलीच पाहिजे.
माझ्या पक्षाचा चुकीचा वागत असेल तर ॲक्शन घ्या. गुन्हेगारीतून मिळालेल्या पैशातून स्वतःचे प्रस्थ वाढविण्याचे काम काहींकडून होते, त्यांना पोलिसांनी ताळ्यावर आणावे.
कायदा व सुव्यवस्था राखताना कोणी त्यात हस्तक्षेप करत असेल तर वरिष्ठ अधिकाऱयांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असेही पवार म्हणाले.
डॉ. मनोज लोहिया म्हणाले, गुन्हेगारांचे रेकॉर्ड सध्या पोलिस ठाण्याच्या सीसीटीएनएसवर आहेच.
परंतु या लोकांचे रेकॉर्ड आता स्पॉटवरच्या कर्मचार्यांना यानिमित्ताने उपलब्ध होईल.
हा डेटा सुरक्षित असेल. त्याचा सर्व्हर पोलिस कार्यालयातच असेल. याला सुरक्षित ॲक्सेस असेल.
या सॉफ्टवेअरवर गुन्हेगाराची सर्व माहिती एकाच जागी मिळणार असल्याचे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
त्याच्यावर दाखल गुन्हे, त्याच्या घरचा पत्ता, जवळच्या लोकांचे संपर्क क्रमांक, त्याच्या वकिलाचा संपर्क क्रमांक, त्याला वारंवार मदत करणारे लोक असा एक ना अनेक बाबी या ॲपवर साठविल्या जातील.
त्यामुळे मोक्का अथवा अन्य प्रकारच्या कारवाईत, आरोपीचा माग काढताना याचा मोठा उपयोग होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण यांनी संयुक्तपणे हे ॲप तयार केले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाने मदत होणार आहे.
या सॉफ्टेवअरमध्ये रेकॉर्डवरील, मालाविषयक गुन्हेगारांची सर्व माहिती, फोटो भरण्यात आले आहेत. त्यामुळे बदलून आलेल्या अधिकारी-कर्मचाऱयाला त्याचे राहण्याचे ठिकाण व मागील रेकाॅर्ड समजू शकेल.
या नवीन अॅपमुळे ब्रिटीश काळापासून चालत आलेली हिस्ट्री शीट मागे पडून अचूक माहिती मोबाईलवरच मिळणार आहे.
प्रत्येक आरोपीच्या घराचे लोकेशन (अंतरासहित)आरोपीचा डिजिटल क्रिमिनल फोटो अल्बम घटकनिहाय व गुन्हे पद्धतीनुसार गुन्हेगारांची यादी तडीपर गुन्हेगार घटक निहाय माहिती या ॲपच्या माध्यमातून पोलिसांना उपलब्ध हाेणार आहे.
हेही वाचलं का ?