पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA ) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम हाती घेतले आहे. त्याकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषी चौकात उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गणेशखिंड आणि सेनापती बापट रस्त्यावरून पाषाण, बाणेर आणि औंधकडे सुरळीत वाहतुकीसाठी विद्यापीठ चौकात सुमारे 55 मीटर लांबीचा गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे चौकात उड्डाणपुलाचे खांब येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यादृष्टीने हे गर्डर तयार करण्याचे काम कंत्राटदार कंपनीकडून हाती घेण्यात आले आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडून तेथे दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित केला आहे. हे काम जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना यापूर्वी झालेल्या 'पुम्टा'च्या बैठकीत देण्यात आल्या होत्या. मात्र, विद्यापीठ चौकातील जलवाहिनी हलविण्याचे काम महापालिकेकडून वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे पुलाचे काम सुरू केल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, म्हणून पोलिसांनी गणेशखिंड रस्त्यावर सुरक्षा अडथळे उभारण्यास पीएमआरडीएला परवानगी दिली नव्हती.
त्यामुळे या चौकातील काम सुरू झाले नव्हते. त्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 'पुम्टा'च्या बैठकीत महापालिका आणि पोलिस अधिकार्यांना जाब विचारत तातडीने परवानगी देण्याचे आदेश राव यांनी दिले होते. तसेच विद्यापीठ चौकात पुलाचे काम सुरू करण्यासाठी रस्त्यावर सुरक्षा अडथळे उभारण्यास पीएमआरडीएला परवानगी देण्याचे आदेश पोलिसांना दिले.
पुलाचे काम जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ वापरून काम सुरू करावे, अशा सूचना पीएमआरडीएला दिल्या. मात्र, जानेवारी महिन्यात जी-20 परिषदेमुळे हे काम पुन्हा लांबणीवर पडले होते. अखेर या कामाला सुरुवात झाली. विद्यापीठ चौकात पुलाच्या कामासाठी चौक आणि रस्त्यालगत सुरक्षा अडथळे उभारून कामे सुरू झाली.
गणेशखिंड रस्त्यावर ज्या ठिकाणी पूल सुरू होणार आहे त्या ई-स्केअर आणि बाणेर येथे ज्या ठिकाणी पूल उतरणार आहे, त्या ठिकाणीच्या खांबांचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुख्य चौकात उड्डाणपुलाचा खांब उभारल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यावर पर्याय म्हणून या चौकात एकही खांब न उभारता दोन खांबांमध्ये 55 मीटरचे अंतर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या ठिकाणी लोखंडी गर्डर टाकण्यात येणार आहे. मेट्रोच्या दोन खांबांमधील अंतर 38 मीटरचे आहे. मात्र, चौकात हे अंतर जवळपास दुप्पट ठेवण्यात येणार आहे. परिणामी, चौकात खांब उभारण्याची गरज नाही. हा गर्डर 55 मीटर लांबीचा, 18 ते 20 मीटर रुंदीचा असणार आहे, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विद्यापीठ चौकात खांब न उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी दोन खांबांमधील अंतर 55 मीटर लांब ठेवण्यात येणार आहे. त्या दृष्टीने दुमजली उड्डाणपुलाचा नकाशा तयार करण्यात आला आहे.
– विवेक खरवडकर, महानगर नियोजनकार, पीएमआरडीए
हेही वाचा