पिंपरी: पुण्यालगत पुरंदर तालुक्यात नवे विमानतळ उभारण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासानकडून सुरु आहेत. दरम्यान, नव्या विमानतळाच्या निर्णयानंतर या परिसरातील जागांचे दर गगनाला भिडले आहेत. या परिसरात होणारे अवैध व अनिधकृत प्लॉटिंग रोखणे, नागरिकांची फसवणूक होवू नये, यासाठी प्लॉटिंगचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये अनियमितता आढळल्यास पीएमआरडीएच्या वतीने संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. (Latest Pune News)
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत पुरंदर तालुक्यात 15 गावांचा समावेश आहे. त्यातील 3 गावांचे नियोजित विमानतळासाठी भूसंपादन केले जाणार आहे. दरम्यान, आणखी जवळपास दीडशे हेक्टर जमिनीचे नव्याने भूसंपादनाची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे. याबाबत प्रक्रिया सुरु असतानाच, विमानतळाच्या नावाखाली या परिसरात प्लॉटिंग व्यवसाय वाढू लागला आहे. त्यामुळे या टप्प्यातील जमिनीचे भाव देखील वाढले आहेत. अशावेळी नागरिकांची फसणवूक होण्याची शक्यता आहे. तसेच, याबाबत जिल्हा प्रशासनाकडे स्थानिकांनी तक्रारी केल्या आहेत.
दरम्यान, यापूर्वीच पीएमआरडीए प्रशासनाकडून या ठिकाणी सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. या परिसरातील प्लॉटिंगची तपासणी करण्यात येत आहे. अनधिकृत अथवा विनापरवाना सुरु असलेल्या प्लॉटिंगवर नोटीसा काढण्यात येणार असून, कारवाई देखील करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी पीएमआरडीएच्या अतिक्रमणविरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी दोन दिवसांपासून या गावांच्या दौऱ्यावर आहेत. त्याचा अहवाल प्राप्त् झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
या पंधरा गावांत सर्वेक्षण
पीएमआरडीए अंतर्गत संपूर्ण पुरंदर तालुका अद्याप समाविष्ट झालेला नाही. त्यामुळे केवळ 15 गावांतील जमीन खरेदी-विक्री, प्लॉटिंगबाबत सर्वेक्षण सुरू आहे. त्यामध्ये आंबोडी, चिव्हेवाडी, देवडी, दिवे, गुऱ्होली, जाधववाडी, काळेवाडी, केतकावळे, कुंभारवळण, पवारवाडी, सिंगापूर, सोनोरी, उदाची वाडी, वनपुरी, झेंडेवाडी या गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम करण्यात येत आहे.
पीएमआरडीएकडून पूर्वीपासूनच बेकायदा प्लॉटिंगच्या विरोधात मोहिम सुरु आहे. नागरिकांनी देखील कागदपत्रांची शहानिशा करावी. पुरंदर परिसरातील गावांत प्लॉटिंगचे सर्वेक्षण सुरु आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल.दीप्ती सूर्यवंशी पाटील, सहआयुक्त, पीएमआरडीए.