

शत्रुघ्न ओमासे
कळस: खडकवासला कालव्याचा पाणी प्रश्न येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना भोवणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रत्येक वर्षे पाण्यासाठी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागली आहेत. Latest Pune News)
इंदापूर तालुक्याला आत्तापर्यंत हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे या नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली. परंतु, शेतीसाठी खडकवासला कालव्याच्या पाण्याचा ठोस निर्णय कोणत्याच नेत्यांना घेता आला नाही. दौंड तालुक्यातील खडकवासला कालव्याचे शेतीसाठी मिळणारे पाणी व इंदापूर तालुक्याला मिळणारे पाणी, याबाबत शेतकऱ्यांनी कित्येक वेळा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे नक्कीच हा पाणी प्रश्न येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना डोकेदुखी ठरणार आहे.
खडकवासला कालव्यावर असणारी शेती ही संघर्षमय झाली आहे. उन्हाळा आला की शेतकऱ्यांना पाण्यासाठी आंदोलने करावी लागतात, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव नाराजी पसरली आहे. विधानसभेची निवडणूक आली की ’उजनी’तून शेतीसाठी पाणी उचलण्याच्या नुसत्या घोषणा दिल्या जातात. परंतु, एकदा निवडणूक झाली की या दिलेल्या घोषणांचा विचार केला जात नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
इंदापूरच्या हक्काचे खडकवासल्याचे पाणी नक्की मुरते कुठे? हा जाब येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये विचारणार असल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. खडकवासला कालव्यावर इंदापूर तालुक्यातील 27000 हेक्टर शेती अवलंबून आहे. इंदापूर तालुक्याला 1995 पासून ते आत्तापर्यंत मंत्रिपदे मिळून देखील निर्णय घेता आला नाही. खडकवासला कालव्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या निरा डावा कालव्याला बारमाही पाणी आहे, याचाही रोष खडकवासला कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे.
शेतातील उभी असणारी पिके जळून गेल्यानंतरच पाणी येते, अशा शेतकऱ्यांच्या तीव प्रतिक्रिया आहेत. खडकवासला कालव्याचा पाणी प्रश्न येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय नेत्यांना तारेवरची कसरत ठरणार आहे. उजनी धरणातून मराठवाड्यापर्यंत पाणी जात आहे. परंतु, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनाच ते देता येत नाही, ही खंत शेतकऱ्यांनी बोलून व्यक्त केली.