पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि हायटेक करण्यासाठी पुणे पीएमपी प्रशासन आगामी काळात ताफ्यात दाखल होणाऱ्या नवीन १ हजार बसमध्ये 'ऑटोमॅटिक पॅसेंजर काऊंट' हे अत्यंत आधुनिक सॉफ्टवेअर प्रणाली बसवणार आहे. आशियातील एखाद्या सार्वजनिक वाहतूक संस्थेत अशा प्रकारची प्रणाली वापरण्याचा हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.
सध्या पीएमपीएमएलच्या ताफ्यातील जवळपास २ हजार बस धावत आहेत. मात्र, पुणेकरांची सातत्याने वाढणारी लोकसंख्या आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता ही बससंख्या अपुरी पडत आहे. प्रवाशांची वाढती गरज भागवण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून नवीन १ हजार बस खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या नव्या बसच्या ताफ्यातच ही आधुनिक प्रणाली लागू केली जाणार आहे.
या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पीएमपीएमएलच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच प्रवाशांच्या प्रवासाचे नियोजन करणे आणि गर्दीच्या मार्गांवर योग्य त्या प्रमाणात बसेस सोडणे प्रशासनाला अधिक सोपे होणार आहे.
कसे काम करणार 'ऑटोमॅटिक पॅसेंजर काऊंट'?
या प्रणालीअंतर्गत बसमध्ये आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. हे कॅमेरे बॅकएंडला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाशी जोडलेले असतील. बसमध्ये नेमके किती प्रवासी चढले आणि किती प्रवासी उतरले, याची अचूक नोंद हे एआय सॉफ्टवेअर रिअल-टाईम ठेवेल आणि त्याची माहिती थेट कंट्रोल रूमला पाठवेल.
पारदर्शकता आणि उत्पन्नातील सुसूत्रता
बसमधील प्रत्यक्ष प्रवाशांची संख्या आणि तिकीट विक्रीतून मिळालेले उत्पन्न यामध्ये अनेकदा तफावत किंवा गोंधळ पाहायला मिळतो. या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांची संख्या आणि तिकीट वसुलीचा डेटा तंतोतंत जुळवणे सोपे होणार असून गैरप्रकारांना आळा बसणार आहे. नवी प्रणाली लागू झाल्यामुळे प्रवासीसंख्या आणि दैनंदिन उत्पन्न यातील तफावत व गोंधळ कायमचा दूर होण्यास मदत होईल आणि पीएमपीएमएलचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला.