पुणे

‘पीएमपी’ला ब्रेकडाऊनच्या विळख्यात : दिवसाला 50 बस रस्त्यात पडतात बंद

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीच्या ताफ्यातील दररोज सरासरी 50 बस ब्रेकडाऊन होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणेकर प्रवाशांचे हाल होत असून अत्यावश्यक कामानिमित्त प्रवास करताना प्रवाशांवर बस बदलण्याची वेळ येत असल्याचे दिसून येत आहे.
पीएमपीच्या ताफ्यात 2081 बस आहेत, त्यापैकी दररोज 1600 ते 1700 बसगाड्या मार्गांवर असतात. उर्वरित 300 ते 350 बस देखभाल, दुरुस्ती, इंजिन काम, वॉशिंग आणि स्पेअर बसेस या कारणांसाठी डेपोंमध्ये असतात. दररोज मार्गांवर असलेल्या बस प्रवाशांसाठी अपुर्‍या आहेत. त्यातील 50 बस रस्त्यातच ब्रेकडाऊन होतात. त्यामुळे बस प्रवाशांचे चांगलेच हाल होतात.

मार्च महिन्यात 1467 ब्रेकडाऊन

दररोज सरासरी पीएमपीच्या 50 बस रस्त्यांवर बंद पडत आहेत. मात्र, मार्च 2024 या एकाच महिन्यात 1 हजार 468 बस रस्त्यात बंद पडल्याची नोंद पीएमपी प्रशासनाने केली आहे. मार्च महिन्यातील 27 तारखेला सर्वाधिक 71 बस बंद पडल्या होत्या, तर 12 तारखेला 69 बस, तर 19 तारखेला 64 बस बंद पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पीएमपीने बस गाड्यांचे ब्रेकडाऊन रोखण्याकडे पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. पीएमपीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते आणि सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर आता याबाबत काय उपाययोजना करणार, हे पहावे लागणार आहे.

…तरच ब्रेकडाऊन रोखण्यात येईल यश

तत्कालीन अध्यक्षा नयना गुंडे यांच्या काळात बस ब्रेकडाऊनऐवजी बसला आगी लागण्याच्या घटना सर्वाधिक घडत होत्या. दिवसाला सुमारे 5 ते 6 बस गाड्यांना रस्त्यातच आगी लागायच्या आणि प्रवाशांची धावाधाव व्हायची. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना त्या वेळी घडली नाही. परंतु, बस गाड्यांचे नुकसान व्हायचे. त्या वेळी नयना गुंडे यांनी पीएमपीच्या आजी/ माजी अभियंत्यांसह तज्ज्ञांची एक समिती गठीत केली होती. ही समिती दररोज प्रत्येक आगारातील स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बस गाड्यांची, त्यांच्या देखभाल, दुरुस्तीची कडक तपासणी करत आणि त्याचा अहवाल अध्यक्षांना सादर करत. त्यानंतर याबाबत उपाययोजना सुचवत. अशाप्रकारे उपाययोजना केल्यावर आगीच्या घटना शून्य झाल्या. तसाच उपाय पीएमपीचे अध्यक्ष डॉ. कोलते यांनी करावा, त्यानंतरच ब्रेकडाऊन रोखण्यात यश येईल, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT