दिवसभर मौन पाळण्याचे फायदे

दिवसभर मौन पाळण्याचे फायदे

मौनाला भारतीय संस्कृतीमध्ये आध्यात्मिक अधिष्ठान आहे. अनेक व्रत आणि विधींवेळी मौन पाळले जात असते. महात्मा गांधीजी यांच्यासारख्या अनेक महान व्यक्तीही मौनाची शक्ती ओळखून होत्या. आधुनिक काळात मात्र मौन कमी आणि वाचाळपणा अधिक असा प्रकार झाला आहे; मात्र सध्या मौन हे 'स्पीच फास्टिंग' या नव्या नावाने समोर येत आहे. दिवसभर न बोलता शांत राहण्याच्या प्रक्रियेला 'स्पीच फास्टिंग' असे म्हणतात. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर प्रभाव पडत असतो. या 'स्पीच फास्टिंग' म्हणजेच मौनाचे काही फायदे असे :

ताण, थकवा होतो कमी : स्पीच फास्टिंगमुळे तुमच्या व्होकल कॉर्डस्ना आराम मिळतो. त्यामुळे ताण आणि थकवा कमी होतो. विशेषत: ज्यांना कामनिमित्त सतत बोलावे लागते, त्यांच्यासाठी ही फायदेशीर गोष्ट असते. एक दिवस शांत राहिल्याने कॉर्टिसोलसारख्या तणावाच्या हार्मोनमध्ये घट होऊ शकते आणि परिणामत: विश्रांती मिळते व चांगली झोप लागू शकते.

संभाषण कौशल्यात सुधारणा : शांत राहिल्याने आत्मनिरीक्षण करता येते आणि स्वत:बद्दल अधिक जाणून घेऊ शकता. तुम्ही इतरांचे अधिक लक्षपूर्वक ऐकता. त्यामुळे तुमच्या विचारात भर पडते. अशा प्रकारे तुम्ही तुमचे संभाषण कौशल्य सुधारू शकता.
आध्यात्मिक लाभ : अनेक धर्मांमध्ये आध्यात्मिक क्रियांवेळी मौन ठेवण्यास अतिशय महत्त्व देण्यात आले आहे. शांत राहून तुम्ही तुमच्या अंतरंगाशी किंवा मनाशी एकरूप होऊ शकता.

शारीरिक विश्रांती : दिवसभर शांत राहिल्याने शारीरिक विश्रांतीही मिळते. मग त्यामुळे तुमच्या व्होकल कॉर्डस्, घशाचे स्नायू व अगदी चेहर्‍याच्या स्नायूंनाही आराम मिळतो. यादरम्यान नैसर्गिक पद्धतीने तुम्ही सखोल श्वास घेऊ शकता. त्यादरम्यान खूप शांत, मोकळे वाटते. संभाव्यतः रक्तदाब आणि हृदयाची गती कमी होते.

एकाग्रतेत वाढ : दिवसभर शांत राहिल्याने मनाची चंचलता कमी होऊन, तुमचे मन एखाद्या स्पष्ट असलेल्या विषयावर अधिक क्षमतेने केंद्रित करणे शक्य होते. त्यामुळे तुम्ही स्वत:सह इतरांशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकता. त्यामुळे कर्तव्यभावना वाढू शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news