Pune Dangerous Wadas Pudhari
पुणे

PMC Dangerous Wadas Notice: पावसाळ्यापूर्वी पुणे महापालिकेचा इशारा; धोकादायक 36 वाडे तातडीने रिकामे करण्याच्या नोटिसा

जुने वाडे कोसळण्याचा धोका वाढला; जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतराचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक आणि राहण्यास अयोग्य ठरलेल्या जुन्या वाड्यांबाबत महापालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशा एकूण 36 मिळकतींमधील रहिवाशांना तत्काळ घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्या असून, संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे की, या इमारती पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता असून, अशा दुर्घटनेत महापालिका जबाबदार राहणार नाही. त्यामुळे संबंधित रहिवाशांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे अत्यावश्यक आहे. धोकादायक इमारतींवर ‌‘धोकादायक‌’ असे फलक लावण्यात आले असून, त्या ठिकाणी सूचनापत्रकेही चिकटविण्यात आली आहेत.

शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर जुने वाडे असून, अनेक ठिकाणी त्यांची स्थिती अत्यंत जर्जर झाली आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी महापालिकेकडून सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी तयार केली जाते. त्यानुसार संबंधित मालकांना दुरुस्तीबाबत नोटिसा दिल्या जातात, तर अतिधोकादायक ठरलेल्या इमारतींच्या पाडकामाची कार्यवाहीही केली जाते.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम 268 (बी) व (सी) अंतर्गत संबंधित मालक, भाडेकरू आणि रहिवाशांना तातडीने घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नोटीस मिळूनही इमारतीत राहणारे नागरिक स्वतःच्या जबाबदारीवर राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, दुरुस्तीची कामे एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2020 नुसार परवानाधारक वास्तुविशारद किंवा स्ट्रक्चरल अभियंत्यांच्या देखरेखीखाली करणे बंधनकारक आहे. आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या नियंत्रण कक्ष (020-25501000) किंवा अग्निशमन दलाच्या 101 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT