शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यास प्राधान्य Pudhari
पुणे

PM Dhan Dhanya Krishi Yojana: शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यास प्राधान्य; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना’चा शुभारंभ; ९ जिल्ह्यांची निवड, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीवर भर

पुढारी वृत्तसेवा

पुणे : केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेतकरी सक्षम व्हावा, यादृष्टीने काम करत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत राज्यातील 9 जिल्ह्यांची निवड झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यास प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच सेंद्रिय शेतीमधील तंत्रज्ञान, कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषिसखींनी मार्गदर्शन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. (Latest Pune News)

प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नवी दिल्ली येथील भारतरत्न सी. सुबमण्यम सभागृहात शनिवारी ( दि.11) दुपारी दूरदृष्यप्रणालीद्वारे झाला. त्या निमित्ताने येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी बँक) सभागृहात आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात कृषिमंत्री भरणे बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर आमदार बापूसाहेब पठारे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, अंकुश माने, अशोक किरनळ्ळी, रफिक नायकवडी, सुनील बोरकर, पुणे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक विठ्ठल शिर्के तसेच पुणे विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत व पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे आदी उपस्थित होते. तर कार्यक्रमास राज्यातील कृषी सखी, प्रगतशील महिला, पुरुष शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

कृषी आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, शेतकऱ्यांनी शेतमालाचे उत्पादन दुप्पट केले आहे. मात्र, उत्पन्नवाढीसाठी त्यांनी कृषिमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्य वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी प्रास्ताविक केले.

कृषिमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या सत्काराने महिला भारावल्या

राज्यांतून आलेल्या काही प्रगतशील महिला शेतकऱ्यांना त्यांचे नाव पुरस्कारांमध्ये नव्हते. त्यावर त्यांनी सभागृहात उघडपणे सेंद्रिय शेतीची माहिती व केलेले काम सांगून आम्ही पुरस्कारापासून वंचित असल्याचे नमूद केले. कार्यक्रमातील सत्कार संपताना स्वतः कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मी तूम्ही केलेले प्रयोग पाहण्यासाठी शेतावर येईल, अशी ग्वाही दिली. एवढेच नाहीतर त्यांच्या गाऱ्हाणे ऐकत केलेल्या कामाची दखल घेऊन कार्यक्रमातच त्यांना स्मृतिचिन्ह देऊन स्वतः गौरविले. त्यामुळे संबंधित महिलांचा आनंद द्विगुणित झाला. यापेक्षा आता वेगळा पुरसकार कशाला? यातच सर्वकाही आले म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT