

पुणे : FYJC admission 2025: अकरावी प्रवेशाचे वाजले ‘बारा’! बारा फेऱ्यांनंतरही राज्यात सव्वाआठ लाख जागा रिक्तएवढ्या फे-या राज्यात अन्य कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राबविल्या जात नाहीत तरीदेखील सव्वाआठ लाखांवर जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाचे अक्षरश: बारा वाजले असल्याचे स्पष्ट झाले आहे.(Latest Pune News)
अकरावी प्रवेशासाठी 11 फेऱ्या राबवूनही जागा रिक्त राहिल्यानंतर प्रवेशासाठी बारावी फेरी राबविण्यात आली आणि संबंधित फेरीतील विद्यार्थ्यांना 10 ऑक्टोबरपर्यंत प्रवेशाची संधी देण्यात आली. तरी देखील सव्वाआठ लाखांवर जागा रिक्त राहिल्यामुळे नेमके कोणाच्या हितासाठी संबंधित प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 551 महाविद्यालयांमध्ये 18 लाख 28 हजार 356 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 3 लाख 46 हजार 642 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 74 हजार 978 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 14 लाख 90 हजार 598 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 11 लाख 77 हजार 226 विद्यार्थ्यांनी कॅपमधून तर 1 लाख 69 हजार 894 विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत अशा 13 लाख 47 हजार 120 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
आता प्रवेशासाठी अद्यापही 6 लाख 51 हजार 130 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 1 लाख 76 हजार 748 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 8 लाख 27 हजार 858 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अकरावी प्रवेशाची शेवटची फेरी सांगून अनेक फेऱ्या राबविण्यात आल्या. परंतु याचा कोणताही फायदा झाला नसल्याचे उघडकीस आले आहे.
त्यामुळे पारंपरिक शिक्षणाकडे न जाता विद्यार्थी तंत्रशिक्षण तसेच कौशल्यशिक्षणाकडे जात असल्यामुळे अकरावी प्रवेशाची बाके रिकामी राहत असताना त्यासंदर्भात उपाययोजना करण्याऐवजी शिक्षण विभाग फेऱ्यांवर फेऱ्या राबवून नेमके काय साध्य करत आहेत? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.