Pingori Owl Festival Pudhari
पुणे

Pingori Owl Festival: अंधश्रद्धा तोडून 'घुबड' संवर्धनासाठी जनजागृती! पिंगोरीत तीन दिवसीय 'भारतीय उलूक उत्सवाचे' आयोजन

इला फाउंडेशनच्या वतीने ४ ते ६ डिसेंबर दरम्यान उत्सव; 'शेतकऱ्यांचे मित्र' असलेल्या घुबडांविषयी वैज्ञानिक माहिती आणि लोककलांचे सादरीकरण.

पुढारी वृत्तसेवा

वाल्हे : पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे इला फाउंडेशनच्या वतीने ‌‘इला हॅबिटॅट‌’ परिसरात तीनदिवसीय भारतीय उलूक उत्सवाचे आयोजन केले आहे. हा उत्सव दि. 4 ते 6 डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे.

घुबड या पक्षाबद्दल समाजामध्ये जनजागृती करणे, घुबडांविषयी वैज्ञानिक माहिती देणे, त्यांचे पर्यावरणीय योगदान, सहअस्तित्व आणि लोकांचा यामध्ये सहभाग मिळविणे, तसेच घुबडाबाबत जे गैरसमज, अंधश्रद्धा आहेत या सर्व गोष्टींचे निर्मुलन करून त्याकडे सकोप दृष्टीकोनाने पाहावे हा या उलूक उत्सवामागील मुख्य उद्देश असल्याचे डॉ. सुरुची पांडे यांनी सांगितले.

या उत्सवासाठी पिंगोरी गावात दोन आकर्षक कमानी उभारण्यात येत आहे. इला हॅबिटॅटच्या मुख्य प्रवेशद्वारी 30 फूट लांबीचा भव्य बोगदा (टनेल) तयार करण्यात येत आहे. यामध्ये विविध घुबड प्रजातींचे आकर्षक कटआउट्‌‍स लावले जाणार आहेत.

यावर्षीचे विशेष आकर्षण असलेल्या पाच फूट उंच शृंगी घुबडाच्या कलात्मक प्रतिकृतीचे रविवारी (दि. 30) सासवड येथील पुरंदर कलामंचमध्ये विद्यार्थी व कला शिक्षक यांच्या हस्ते अनावरण केले. या कार्यक्रमा दरम्यान घुबड हे शेतकऱ्यांचे खरे मित्र असून, पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांवर नैसर्गिक नियंत्रण ठेवतात याबाबत माहिती दिली जाणार आहे.

उत्सव काळात मंचावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. वासुदेव, पिंगळा, गोंधळ या पारंपरिक लोककलेतून, तसेच विद्यार्थ्यांच्या गीत, गायन, नृत्य, वादन या सादरीकरणातून घुबड संवर्धनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. अशी माहिती इला हॅबिटॅटचे मुख्य राहुल लोणकर, उत्सव नियोजन समितीचे राजकुमार पवार, माऊली खोमणे, सचिन शिंदे, आतार, पांडुरंग मदने, मयूर गायकवाड यांनी दिली.

या माध्यमातून घुबडांचे जीवन, त्यांचे पर्यावरणातील योगदान आणि मानवी सहजीवनातील स्थान यावर सर्वांगीण प्रकाश टाकला जाईल. या उत्सवाच्या आयोजनासाठी इला फाउंडेशन आणि टाटा मोटर्स कमर्शिअल व्हेइकल, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहकार्य लाभले आहे. या भारतीय उलूक महोत्सवात परिसरातील नागरिक, शाळा, महाविद्यालये आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सव यशस्वी करतील, असा विश्वास डॉ. सुरुची पांडे यांनी व्यक्त केला.

उत्सवातील प्रमुख उपक्रम

घुबडांवरील शास्त्रीय माहिती आणि सांस्कृतिक वारसा यावर आधारित प्रदर्शन.

घुबड विषयक चित्र, पोस्टर, नाटिका, नृत्य, गायन, वक्तृत्व, रांगोळी, मेहंदी, कथाकथन इत्यादी.

घुबड-थीमवर आधारित वस्तू, दागिने, नाणी, टोपी, पर्स, पिशव्या, पोस्टाची तिकिटे, छायाचित्रे व कलाकृतींचे प्रदर्शन

घुबडांवरील लघुपट, माहितीपट आणि निसर्गावरील पुस्तकांचे सादरीकरण.

हा उत्सव निसर्ग प्रेमींसाठी आगळावेगळा अनुभव ठरणार आहे. भारतात आढळणाऱ्या 42 घुबड प्रजातींबाबत सर्वसमावेशक माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हे उत्सवाचे प्रमुख ध्येय आहे. वर्ष 2019 मध्ये झालेल्या पहिल्या उलूक उत्सवाला 19 देशांतील संशोधकांचा सहभाग लाभला होता. यंदाचा उत्सवही त्याच परंपरेला नवी उंची देणार आहे.
डॉ. सतीश पांडे, संस्थापक, इला फाउंडेशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT