पुणे

पिंपरी गाव-पिंपळे सौदागर पुलाचे काम कासवगतीने

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी गाव ते पिंपळे सौदागरला जोडणार्‍या पवना नदीवरील पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे काम रखडले आहे. वारंवार मुदतवाढ देऊन मागील दोन वर्षापासून हे काम सुरू असूनही केवळ 60 टक्के काम झाले आहे. त्यामुळे वाहनचालक व पादचार्‍यांची गैरसोय होत आहे.

दुसरीकडे, महापालिका प्रशासन ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देत हात वर करीत आहे. पिंपरी गाव व पिंपळे सौदागर पुलाचे काम ठेकेदार व्ही. एम. मातेरे इंफ्रा ही ठेकेदार कंपनी करीत आहे. कामाची मुदत दीड वर्षे होते. सल्लागार ओएस असिस्टीप स्तुप ही एजन्सी आहे. काम संथगतीने सुरू असल्याने या कामास महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने वारंवार मुदतवाढ दिली आहे. मात्र, अद्यापपर्यंत केवळ 60 टक्के काम पूर्ण झाले आहे.

संथगतीने काम केले जात असल्याने परिसरातील वाहनचालक व पादचार्‍यांची गैरसोय होत आहे. जुन्या पुलावर त्यामुळे वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. कामास विलंब लावणार्‍या संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली जात आहे.

ठेकेदाराला दररोज 5 हजार रुपये दंड

पुलाच्या कामास विलंब झाल्याने संबंधित ठेकेदाराला मुदतवाढ द्यावी लागली. मुदतीत काम न केल्यामुळे ठेकेदाराच्या विरोधात वर्षभरापासून दंडात्मक कारवाई सुरू आहे. सद्य:स्थितीत प्रतिदिन 5 हजार रुपये दंड केला जात आहे. तातडीने काम पूर्ण करण्याबाबत ठेकेदाराला सक्त ताकीद दिली आहे, असे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT