पुणे

पिंपरी : पोलीस यंत्रणा अलर्ट

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे न हटविल्यास मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात शनिवारी (दि. 16) ध्वनी प्रदूषण सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.

ठाकरे यांनी मुंबई येथे गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवरील भोंगे न हटवल्यास मशिदीसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचे विधान केले. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले.

पिंपरी- चिंचवड शहरात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सर्व मशिदीच्या सभोवताली बंदोबस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, हिंदुत्ववादी संघटनांच्या हालचालीवर गोपनीय विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

चिखली, भोसरी, चाकण आणि पिंपरी भागात मुस्लिम बांधवांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या भागात नुकतेच शांतता कमिटीच्या बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 16) पोलिस आयुक्तालय स्तरावर ध्वनी प्रदूषण सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये चार पोलिस आधिकारी आणि एक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असणार आहेत.

अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे हे या समितीचे प्रमुख आहेत. आगामी काळात कोणत्याही पोलिस ठाण्यात ध्वनी प्रदूषण बाबतचे गुन्हे दाखल झाल्यास तात्काळ समिती कक्षाला माहिती द्यावी लागणार आहे. याबाबत विशेष शाखेकडून सर्व पोलिस ठाण्यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

ध्वनी प्रदूषण सनियंत्रण समिती स्थापन

बहुतांश मशिदींवर भोंगे

पिंपरी- चिंचवड शहर परिसरात 106 मशिदी आहेत. या व्यतिरिक्त 30 मदरसे, 9 ईदगाह, 29 दर्गे, 17 कब्रस्थान आहेत. यातील बहुतांश मशिदींवर भोंगे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

महाराष्ट्र सायबर सेलकडून सोशल कॅम्पेन

राज ठाकरेंच्या विधानानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी महाराष्ट्र सायबर सेलकडून सोशल कॅम्पेन राबवण्यात येत आहे. कोणत्याही जाती/धर्माच्या भावना दुखावतील, असे फोटो मजकूर सोशल मीडियावर (फेसबुक व्हाट्स अप, इंस्टाग्राम व ट्विटरवर) पोस्ट करू नये.

अशा प्रकारच्या कृत्यांवर पोलिसांची करडी नजर असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, सामाजिक सलोखा राखण्यास मदत करा. कोणत्याही समाजविघातक कृत्यात सहभागी होऊ नका, अशा प्रकारचा मजकूर असलेले संदेश व्हायरल करण्यात येत आहेत.

अशी आहे ध्वनी प्रदूषण सनियंत्रण समिती

  • डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त
  • डॉ. काकासाहेब डोळे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा
  • मंचक इप्पर, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक
  • आनंद भोईटे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन
  • सूर्यकांत डोके, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ही समिती स्थापना करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण बाबतच्या कायद्यांचे तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. शहर, जिल्हा स्तरावर अशा प्रकारच्या समित्या स्थापन केल्या जातात.
– डॉ. काकासाहेब डोळे, पोलिस उपायुक्त,पिंपरी- चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT