१२ तासांच्‍या आतच ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती; कोण आहेत हे अधिकारी? | पुढारी

१२ तासांच्‍या आतच ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती; कोण आहेत हे अधिकारी?

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील बदल्या आणि बढत्यांचा आदेश गृहमंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केला. मात्र १२ तासांच्या आतच यामधील ५ अधिकाऱ्यांच्या बदलीला गृहमंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.

मुंबईसह ठाण्यातील पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्तांसह ५ आयपीएस अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली होती. मात्र लगेचच या स्थगिती दिल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. विरोधकही या निर्णयावर टीका करत आहेत.

राजेंद्र माने, महेश पाटील, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे पोलीस अधिकाऱ्यांना बदली आणि बढती दिली होती. मात्र, पुढील आदेश येईपर्यंत हा निर्णय स्थगित करण्यात आल्याचे गृहमंत्रालयाकडून आलेल्या पत्रात म्हटले आहे.

हे पोलीस अधिकारी कोण? 

१) राजेंद्र माने राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावर कार्यरत होते आणि त्यांना ठाणे शहरात पूर्व प्रादेशिक विभागात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली होती.

२) महेश पाटील यांना पोलीस उपायुक्त पदावरुन मुंबईतील वाहतूक विभागात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली होती.

३) संजय जाधव पुण्यातील महामार्ग सुरक्षा पथकात पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची ठाणे शहरात अप्पर पोलीस आयुक्तपदी (प्रशासन) बढती करण्यात आली होती.

४) पंजाबराव उगले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून पोलीस मुंबईत अप्पर पोलीस आयुक्तपदी (सशस्त्र पोलीस) बढती देण्यात आली होती.

५) दत्तात्रय शिंदे यांनी पालघरमधील पोलीस अधीक्षक पदावरुन मुंबईत अप्पर पोलीस आयुक्तपदी (संरक्षण व सुरक्षा) बढती देण्यात आली होती.

भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले हा ‘पोरखेळ’

“या सरकारने बदल्यांचा पोरखेळ चालवला आहे. या सरकारचा बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात, त्याआधी गृहमंत्र्यांची सही असते. आता १२ तासांत त्यावर स्थगिती दिली आहे. स्थगिती का दिली याबाबत सरकराने खुलासा केला पाहिजे. गेल्यावेळी जे वाझे प्रकरण झालं त्याचीच ही छोटी आवृत्ती असल्याचं आमचं मत आहे”, असा आरोप भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.

पाहा व्हिडिओ : भोंग्यांचे राजकारण I पुढारी | अग्रलेख

हे वाचलंत का? 

Back to top button