पुणे

Pimpri News : ‘बर्न वॉर्डसाठी विविध पर्यायांवर विचार सुरू’

Laxman Dhenge

पिंपरी : तळवडे येथील कारखान्यात घडलेल्या दुर्घटनेनंतर जळित रुग्णांसाठी बर्न वॉर्ड सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाने विविध पर्यायांवर विचार सुरू केल्याचे 'वायसीएम' प्रशासनाकडून सांगण्यात आले. तळवडे येथील दुर्घटनेत 9 महिला कामगारांचा मृत्यू झाला. शहरामध्ये महापालिकेचा बर्न वॉर्ड नसल्याने जखमी रुग्णांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी हलवावे लागले. याबाबतचे सविस्तर वृत्त दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झाले.

त्याचप्रमाणे, आमदार महेश लांडगे यांनी विधिमंडळ अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. त्याशिवाय, विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी देखील हा मुद्दा लावून धरला आहे. त्या पार्श्वभूमीवर याबाबत माहिती देताना वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, वायसीएमजवळील दीड एकर मोकळ्या जागेत रुग्णालय, अतिविशिष्ट सेवा विभाग, नर्सिंग कॉलेज तसेच बर्न वॉर्ड सुरू करण्याबाबत विचार होऊ शकतो. ही कार्यवाही करण्यास विलंब लागणार आहे.

त्यामुळे आकुर्डी रुग्णालय, जुने भोसरी रुग्णालय, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (चिंचवडगाव), नवीन थेरगाव रुग्णालय येथे बर्न वॉर्ड सुरू करता येईल का, याविषयी चर्चा करण्यात आली आहे. थेरगाव रुग्णालयात यापूर्वी बर्न वॉर्ड प्रस्तावित होता.
मात्र, कोरोनाच्या काळात हा प्रस्ताव मागे पडला. दरम्यान, तेथे नव्याने बर्न वॉर्ड सुरू करायचा ठरल्यास एक मजल्याचे बांधकाम करावे लागणार आहे. त्यामुळे या विविध प्रस्तावांपैकी एका प्रस्तावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT