Pimpri News : वरिष्ठ निरीक्षक ‘ऑन पनिशमेंट ड्युटी’ | पुढारी

Pimpri News : वरिष्ठ निरीक्षक ‘ऑन पनिशमेंट ड्युटी’

संतोष शिंदे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पोलिस ठाण्यातील बिट मार्शल, डायल 112 आणि दामिनी पथकांच्या सेवांचा गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी आयुक्तालय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठांकडून याबाबतच्या वेळोवेळी सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागील महिन्यात याबाबतचा पोलिस ठाणेनिहाय आढावा घेण्यात आला. यामध्ये काही पोलिस ठाण्यांची कामगिरी असमाधानकारक असल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधित ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यास एक दिवस नियंत्रण कक्षाला ड्युटी लावण्याचा फतवा काढण्यात आला.

त्यानुसार, आता दररोज एक वरिष्ठ निरीक्षक नियंत्रण कक्षात बसून कामकाज पाहत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील वाढता ‘स्ट्रीट क्राईम’ रोखण्यासाठी ‘व्हिजिबल पोलिसिंग’ करण्याबाबत पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आदेश दिले आहेत. पोलिस ठाण्यातील बिट मार्शल, डायल 112 चे अंमलदार आणि दामिनी पथकातील महिला कर्मचारी यांना सतर्क रहाण्याच्या सूचना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. यावर ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी लक्ष देणे अपेक्षित आहे.

दरम्यान, मागील महिन्यात आयुक्तालयाकडून सर्व पोलिस ठाण्यांतील पथकांचा प्रतिसाद तपासण्यात आला. यामध्ये बहुतांश पोलिस ठाण्यांची कामगिरी असमाधानकारक असल्याचे समोर आले. तसेच, संबंधित प्रभारी अधिकारी याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिस आयुक्त चौबे यांनी सर्वच निरीक्षकांना एक दिवस नियंत्रण कक्ष येथे ‘पनिशमेंट ड्युटी’ लावण्याचे आदेश दिले. नियंत्रण कक्ष येथे ड्युटी करत असताना संबंधित वरिष्ठ निरीक्षकांनी डायल 112, बिट मार्शल आणि दामिनी पथकांचे कामकाज समजून घ्यायचे आहे. तसेच, ’व्हिजिबल पोलिसिंग’साठी लागणारी सर्व कामे नियंत्रण कक्ष येथे बसून करायची आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार लावण्यात आलेल्या ही ‘पनिशमेंट ड्युटी’ पोलिस वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

पोलिस आयुक्तांना द्यावी लागणार माहिती

नियंत्रण कक्षाला सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत ड्युटी केल्यानंतर संबंधित वरिष्ठ निरीक्षकांनी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांना समक्ष माहिती द्यायची आहे. व्हिजिबल पोलिसिंगमधील त्रुटी त्यांच्या समोर ठेवायच्या आहेत. पोलिस पथकांना व्हिजिबल पोलिसिंग करताना नेमक्या काय समस्या येतात, त्यावर आणखी काय उपायोजना आवश्यक आहेत, याबाबतची माहिती मिळवणे हा यामागचा उद्देश आहे.

एक दिवसासाठी नियंत्रण कक्षाला संलग्न करण्यात आलेल्या वरिष्ठ निरीक्षकांची कामे

  • व्हिजिबल पोलिसिंगसाठी नेमलेल्या वाहनांचे लोकेशन तपासणे
  • डायल 112 चा प्रतिसाद टाइम तपासणे
  • कॉलरला फोन करून खातरजमा करणे
  • बिट मार्शल सतर्क गस्त घालत आहेत की नाही, याबाबत खात्री करणे
  • मार्शलची जीपीएस प्रणाली सुरू असल्याचे सुनिश्चित करणे
  • दामिनी पथक शाळा, कॉलेज, क्लासेस, पार्क आदी परिसरात गस्त घालत आहेत की नाही, याची शहानिशा करणे.

शहरात व्हिजिबल पोलिसिंग वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी वरिष्ठ निरीक्षकांना डायल 112, बिट मार्शल आणि दामिनी पथकांबाबतच्या कामकाजाची माहिती असणे आवश्यक आहे, यासाठी दररोज एका वरिष्ठ निरीक्षकास नियंत्रण कक्ष येथे बसून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

– सतीश माने, सहायक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी, पिंपरी- चिंचवड

हेही वाचा

Back to top button