दुष्काळग्रस्त पुरंदरची केंद्रीय पथकाकडून पाहणी | पुढारी

दुष्काळग्रस्त पुरंदरची केंद्रीय पथकाकडून पाहणी

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  पुरंदर तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण असून, मंगळवारी (दि. 12) केंद्रीय दुष्काळ पथकाने तालुक्यातील शिवरी, तक्रारवाडी, साकुर्डे आणि नाझरे धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शेतकर्‍यांशी चर्चा करून अडीअडचणी जाणून घेतल्या. राज्य सरकारने राज्यातील 42 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून त्याचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला होता. या अहवालाची दखल घेत केंद्रातून 12 जणांची दुष्काळ पथके आली आहेत. त्यापैकी तीन पथके पुणे, सोलापूर जिल्ह्यात माहिती घेत आहेत.
एका पथकाने मंगळवारी पुरंदर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. या पथकातील अन्नपुरवठा विभागाच्या सरोजिनी रावत, पाणीपुरवठा विभागाचे ए. ए. मुरलीधरन यांनी शिवरी येथील दुष्काळाने ज्वारी पिकाचे झालेले नुकसान, तक्रारवाडी येथी रब्बीचे पीक, साकुर्डे येथे फळबागा, पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेले टँकर आणि नाझरे धरणावरील पाण्याच्या स्थितीची पाहणी करून माहिती घेतली. या वेळी प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, कृषी अधिकारी सूरज जाधव, गटविकास अधिकारी अमिता पवार, जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, नाझरे प्रकल्पाचे अनिल घोडके, आदी उपस्थित होते. पुरंदर तालुक्याची दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. नाझरे धरणातील पाणीसाठा खूपच कमी झाला असून, त्यात गाळाचे प्रमाण अधिक असल्याचे केंद्रीय पथकातील मुरलीधरन यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button