पुणे: पिंपरीतील अजमेरा कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाने आर्थिक विवंचनेच्या पार्श्वभूमीवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार (दि. १) सकाळी उघडकीस आली. या घटनेत कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला असून, पत्नी आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. घटनास्थळावरून हस्तलिखित चिठ्ठीसह काही साहित्य जप्त करण्यात आले असून, संत तुकाराम नगर पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत.
विनोद पिल्लाई (५०), सिल्जा पिल्लाई (४५) आणि पूर्णिमा पिल्लाई (१९, सर्व रा. करिष्मा ग्लोरी हाउसिंग सोसायटी, अजमेरा, पिंपरी; मूळ रा. केरळ) अशी संबंधितांची नावे आहेत. यापैकी विनोद पिल्लाई यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. संत तुकारामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद पिल्लाई यांनी संगणकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. ते खासगी कंपनीत कार्यरत होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांनी नोकरी सोडल्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिघडली. त्यानंतर नेहरूनगर येथील स्वतः चे घर विकून कुटुंब अजमेरा परिसरातील भाड्याच्या घरात राहू लागले. तसेच, मूळ गावी सुरू असलेल्या घराच्या बांधकामामुळे आर्थिक ताण वाढल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
प्राथमिक तपासानुसार, घरात कोळसा पेटवून त्यावर रासायनिक पदार्थ टाकण्यात आला. त्यातून निर्माण झालेल्या विषारी धुरामुळे तिघेही बेशुद्ध झाले. शनिवारी सकाळी सिल्जा पिल्लाई या शाळेत न पोहोचल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न मिळाल्याने सोसायटीतील नागरिकांनी घराची पाहणी केली असता तिघेही बेशुद्धावस्थेत आढळले.
त्यानंतर त्यांना यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी विनोद पिल्लाई यांना मृत घोषित केले. सिल्जा आणि पूर्णिमा यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून रासायनिक पदार्थाचा डबा, कुरिअरचे पाकीट, कोळशाची राख, कोळसा तसेच हस्तलिखित चिठ्ठी जप्त करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक अडचणींमुळे जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख त्या चिठ्ठीत असून, या कृतीसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. तिघांचे मोबाईल फोनही पोलिसांनी
ताब्यात घेतले आहेत. संबंधित रासायनिक पदार्थाची खरेदी, इंटरनेटवरील शोध, आर्थिक व्यवहार, कर्जाची माहिती तसेच अन्य तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासानंतर घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.