पुणे

पिंपरी : जुन्या सातबारासाठी पिंपरी-चिंचवडकरांना गाठावे लागतेय स्वारगेट

अमृता चौगुले

राहुल हातोले

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड शहरात 2013 मध्ये आकुर्डीमध्ये अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले. गेली नऊ वर्ष झाले तरीही अद्याप देखील जुने सात बारा उतारे, फेरफार उतारे व इतर संबंधित जुनी महसुली कागदपत्रे शहरातील जनतेला अप्पर तहसील कार्यालयात मिळत नाहीत.

यासर्वांमध्ये आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तसेच कार्यालयात पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेला पार्क केलेली दुचाकी दोन वेळा वाहतूक विभागाने उचलून नेली. एकतर ज्या कामासाठी हेलपाटे मारतोय ते पूर्ण होत नाही आणि दुसरीकडे वाहतूक विभागाला दंड भरण्याचा त्रास सोसावा लागतोय.

त्यामुळे शहरातच ही कागदपत्रे मिळतील याची सोय शासनाने करावी.यासाठी स्वारगेट येथील खडकमाळ कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. चार ते पाच फेर्‍या मारूनही वेळेवर कागदपत्रे मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. त्यासोबतच खडकमाळ कार्यालयात गेल्यावर पाकिर्ंंग अभावी नागरिकांना वाहने रस्त्यावर पार्क करावी लागत आहेत.

मात्र, वाहतूक विभागाची कारवाई होत असल्याने नागरिकांना नाहक दंड भरावा लागत आहे. यासर्व मानसिक आणि आर्थिक त्रासाला नागरिक कंटाळले आहेत. म्हणून सर्व जुनी कागदपत्रे अप्पर तहसीलदार कार्यालयात मिळावी, यासाठी शहरातील जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अ‍ॅड. अनिरुद्ध कांबळे, सचिव सचिन साठे व मकरध्वज यादव यांनी अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.

नागरिकांची गैरसोय

  • स्वारगेट कार्यालयात एका कामासाठी चार ते पाच वेळा हेलपाटा.
  • खडकमाळ, स्वारगेट कार्यालयात दलालांचा सुळसूळाट.
  • पार्किंगची गैरसोय होत असल्याने रस्त्यावर होत आहे पार्किंग.
  • वाहतूक विभागाच्या कारवाईने नाहक सोसावा लागतोय दंड.

या आहेत प्रातिनिधीक स्वरूपातील दोन घटना.

  • एमआयडीसीमध्ये जमिनी गेल्यामुळे त्याचा मोबदला मिळण्यासाठी पूर्वजांचा सात बारा उतारा आवश्यक आहे. मात्र, आकुर्डी येथील अप्पर तहसील कार्यालयात जुने दस्तऐवज उपलब्ध नसल्याने स्वारगेट येथील खडकमाळ परिसरात हेलपाटा मारावा लागत आहे. एका कागदासाठी पाच ते सात वेळ चकरा माराव्या लागतात. परिणामी वेळ आणि प्रवासासाठी आर्थिक भार सहन करावा लागत आहे. तरीही कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत. मात्र, आकुर्डी येथील कार्यालयात सर्व दस्तऐवज उपलब्ध झाले तर सोयीचे ठरणार आहे. 

                              – प्रतिक जगताप, निगडी                                                                                                                                                                                                                                                                                                   

  • उच्च शिक्षणासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यासाठी आजोबांच्या पूर्वीच्या सातबारा उतार्‍यावर जातीचा उल्लेख असल्याने त्याची आवश्यकता होती. मात्र, आकुर्डी येथील अप्पर तहसिल कार्यालयात ही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने स्वारगेट येथील हवेली कार्यालयात जावे लागते. तीन ते चार वेळा हेलपाटा मारूनही कागदपत्रे हाती मिळत नव्हती. परंतु कार्यालयाच्या परिसरातील दलालांच्या हाती चिरीमीरी टेकविल्याशिवाय तातडीने कागदपत्रे मिळत नसल्याचे दिसून आले आहे.

                               – प्रिती गायकवाड, भोसरी.

आकुर्डी येथील अप्पर तहसील कार्यालयाला अद्यापही स्वतःची जागा नाही. आहे तीच जागा अपुरी असल्याने सर्व तीस गावांचा दस्तऐवज या ठिकाणी ठेवणे शक्य नाही. 2013 व नंतरची सर्व कागदपत्रे येथे उपलब्ध आहेत. मात्र, त्यापूर्वीच्या कागद पत्रांसाठी स्वारगेट येथील खडक माळ कार्यालयात जावे लागते. पीएमआरडीएने अप्पर तहसील कार्यालयाची जागा देखील खाली करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे पत्र व्यवहार सुरू असून, स्वतंत्र अभिलेख कक्ष निर्माण करण्याची मागणी देखील केली आहे.

           – प्रविण ढमाले, नायब तहसीलदार तथा जन माहिती अधिकारी, आकुर्डी.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT