पिंपरखेड: सध्या कोबी पिकाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने घेतलेल्या कोबी पिकाला बाजारात अपेक्षित उठाव नसल्याने बेट भागातील शेतकरी निराश झाले आहेत.
कोबी लागवडीपासून मशागत, रोपे, खते, औषधांची फवारणी, पाणी, मजुरी तसेच काढणी व वाहतूक, यावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. पीक चांगले आले असले तरी बाजारभाव समाधानकारक नसल्याने उत्पादन विक्रीतून झालेला खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे.
बेट भागातील कोबी मंचर, नारायणगाव येथील बाजार समितीत विक्रीसाठी जात आहे. सध्या बाजारात कोबीची आवक वाढली असून, मागणीच्या तुलनेत उठाव कमी असल्याने भावावर परिणाम झाला आहे.
प्रतिदहा किलोस प्रतवारी नुसार ३० ते ७५ रुपये भाव मिळत आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. उत्पादन खर्च आणि मिळणारा बाजारभाव, यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.
कोबीला चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पीक घेतले. मात्र, भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताळमेळ बिघडला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळावा, अशी अपेक्षा कोबी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.