

पुणे: सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली होणारे ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीचे अडथळे, हे नागरी प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहेत. त्यांचे समर्थन करता येत नसल्याने धर्मस्वातंत्र्याची ढाल पुढे करून नागरिकांवर अघोषित बंधने लादली जात आहेत, अशी टीका विद्यानंद बापट यांनी रविवारी केली. तसेच उत्सवांच्या काळात नागरिकांनी स्वतःची घरे सोडून जाणे हा उपाय नसून, त्रास निर्माण करणाऱ्या घटकांवरच कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी कायदेशीर लढा लढावा लागणार असून, एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
मधुरजग फाउंडेशन, ब्राइट्स सोसायटी, विचारवेध यांच्या वतीने 'आवाज शांततेचा' कार्यक्रमात विद्यानंद बापट यांचा सत्कार ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात आला, त्या प्रसंगी बापट बोलत होते. प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमीत, अभिनेते सुमीत राघवन, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि कुमार नागे या वेळी उपस्थित होते.
पेठांमधील अरुंद रस्ते आणि दाट वस्ती लक्षात घेता उत्सवकाळातील परिस्थिती नागरिकांसाठी असह्य होते. अनेक नागरिक उत्सवकाळात पेठा सोडून जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, पीडित नागरिकांनीच घर सोडावे, हा 'व्हिक्टिम ब्लेमिंग'चा प्रकार आहे. ध्वनिवर्धक, डीजे किंवा डॉल्बी अशा वेगवेगळ्या नावांमागे न जाता कोणत्याही कृत्रिम ध्वनिवर्धक यंत्राच्या वापराबाबत नियमांची अंमलबजावणी अपेक्षित आहे. सार्वजनिक उत्सवांसाठी परवानगी देताना त्याचे संभाव्य दुष्परिणाम विचारात घेणे आवश्यक आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. परवानगी दिल्यानंतर पश्चात्ताप करण्यात कोणते स्वारस्य आहे? असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.
दरम्यान, ध्वनिप्रदूषणाबाबत बापट यांनी आवाज उठवल्याने मुंबई उच्च न्यायालयाने यामध्ये पुन्हा लक्ष घातले आहे. त्यामुळे विद्यानंदचे काम हा नागरिकाने व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करतो. नदीपात्रातील किंवा पादचारी मार्गावरचे अतिक्रमण, रस्तेदुरुस्ती, कचरा व्यवस्थापन अशा विषयांमध्ये वैयक्तिक पातळीवर विरोध केला पाहिजे, असे मत पालेकर यांनी व्यक्त केले.
'संस्कृतीपेक्षा सुसंस्कृतपणा महत्त्वाचा' असल्याचे सांगत शांतता ही केवळ पुस्तकात राहिल्याची खंत अभिनेता सुमीत राघवन यांनी व्यक्त केली. विचारांची पातळी खालावली असून, आवाजाची पातळी वाढली आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. समाज हा एक देह असून, प्रत्येक नागरिक त्यातील पेशी आहे; प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडल्यास समाज अधिक सुदृढ होईल, असे राघवन म्हणाले.
समाजात अविवेकी गोंधळ असताना काहीतरी करायला हवे, असे वाटते. माझी पिढी विचारच करीत बसली. पण, आता विद्यानंद यांच्यामागे नाही; परंतु गरज असेल किंवा नसेल, तरीही सोबतीची खात्री देते.
चिन्मयी सुमीत, अभिनेत्री