

पुणे: तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) चाकणमधील पाच प्रमुख ठिकाणी रस्ते रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्यामुळे चाकण औद्योगिक वसाहतीकडे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
खालुंब्रे, खालुंब्रे घाट, एचपी चौक, म्हाडा सोसायटी चौक आणि खराबवाडी या पाच ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी सध्या सुमारे १० मीटर असलेली रस्त्याची रुंदी १५ मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होऊन वाहनांची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाची लांबी सुमारे ५४ किलोमीटर आहे. या मार्गावर चाकण औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. रस्त्याची क्षमता आणि वाहनांची संख्या यामध्ये मोठी तफावत असल्याने सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होते.
पीडब्ल्यूडीकडून महामार्गावरील खड्डे दुरुस्त करण्यासोबतच आवश्यक त्या ठिकाणी रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ५.१ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, या महामार्गासाठी भविष्यात चारपदरी उन्नत मार्गिकेची योजना प्रस्तावित आहे. उन्नत मार्गिकेचे काम प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत सध्याच्या रस्त्याचे रुंदीकरण केल्याने स्थानिक आणि औद्योगिक वाहतुकीवरील ताण काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
वाहनचालकांना ३० ते ४५ मिनिटांचा विलंब
चाकण एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि कामगारांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतो. मुख्य महामार्गावर कोंडी झाल्यास औद्योगिक क्षेत्रात पोहोचण्यासाठी वाहनचालकांना अनेकदा ३० ते ४५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागतो. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत असून, रस्ते रुंदीकरणाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
चाकणमधील प्रमुख कोंडीची ठिकाणे
खालुंब्रे
खालुंब्रे घाट
एचपी चौक
म्हाडा सोसायटी चौक
खराबवाडी