Pune Nashik Highway Protest Pudhari
पुणे

Junnar Crime: चिमुकलीवरील अत्याचारानंतर पिंपळवंडीत संतापाचा उद्रेक; पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको

‘चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे’; आरोपीवर पोक्सोअंतर्गत कारवाई, फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालविण्याची तयारी

पुढारी वृत्तसेवा

आळेफाटा: पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे सुमारे दहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी बुधवार (दि. 19) सकाळी दहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावरील पिंपळवंडी स्टॅण्ड येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी “चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे”, “आरोपीला फाशी झालीच पाहिजे” अशा घोषणा देत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मंगळवारी (दि. १८) पिंपळवंडी गावठाण परिसरात ही घटना घडली. चिमुकली घरात एकटी असल्याचा फायदा घेत 25 वर्षीय तरुणाने तिला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिची त्याने हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

चिमुकली बराच वेळ दिसून न आल्याने कुटुंबीयांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. काही वेळातच चिमुकलीचा मृतदेह शोधून काढण्यात आला. याप्रकरणी संशयित आरोपी साहिल संपत खैरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, कसून चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंगगिल यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, बुधवारी सकाळी गाव बंद ठेवत ग्रामस्थ मोठ्या संख्येने पुणे नाशिक महामार्गावर एकत्र आले आणि रास्ता रोको आंदोलन केले.

आंदोलनाची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी आरोपीवर पोक्सो कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून, प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती ग्रामस्थांना दिली.

मात्र, केवळ आरोपीवर कारवाई करून न थांबता चिमुकलीच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात यावे, त्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळावी आणि न्याय मिळेपर्यंत ठोस लेखी आश्वासन देण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. लेखी आश्वासन मिळेपर्यंत रास्ता रोको सुरूच ठेवण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

अखेर नायब तहसीलदार सचिन मुंडे यांनी घटनास्थळी येऊन संबंधित कुटुंबीयांना शासनाच्या वतीने आवश्यक ती मदत व योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.

या आंदोलनावेळी माजी सभापती रघुनाथ लेंडे, संगमनेर भाजपा तालुकाध्यक्ष योगेश सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे, सरपंच मेघाताई काकडे, माजी सभापती संगीता वाघ, सुप्रिया लेंडे, मोनाली खोंड यांच्यासह पिंपळवंडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT