Mhallunge Road Potholes: म्हाळुंगेच्या खड्ड्यांनी घेतला चिमुकल्याचा जीव; रस्तेदुरुस्तीच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न

११ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर नागरिक संतप्त; खड्डे, चिखल अन् निकृष्ट पॅचवर्कविरोधात महापालिकेवर सवालांची सरबत्ती
Road Potholes
Road PotholesPudhari
Published on
Updated on

बाणेर: म्हा‍ळुंगे-नांदे रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या मातीमुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात विराज संदीप पाटोळे या ११ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Road Potholes
Sugar Price Hike: साखरेच्या दरात तीन दिवसांत क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ; किरकोळ दर ६० रुपयांवर

म्हा‍ळुंगे परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात दोन आठवड्यांपूर्वी स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले होते. मात्र, आंदोलन करूनही प्रशासनाने रस्त्यांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळेच निष्पाप बालकाचा जीव गेल्याचा आरोप करीत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आमदार शंकर मांडेकर तसेच पोलिस अधिकार्‍यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. मात्र, पाहणीपलिकडे रस्त्याची समस्या कधी सुटणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही रस्त्यांची दुरवस्था कायम राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगेतील खड्ड्यांच्या समस्येबाबत पोलिसांकडून महापालिकेला यापूर्वीच पत्र दिले आहे.

Road Potholes
Shirur Mephedrone Drug Case: शिरूरमध्ये २२ लाखांचे मेफेड्रॉन जप्त; दोघांना रंगेहाथ अटक

मात्र, अद्याप या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. माण-म्हा‍ळुंगे हायटेक सिटीअंतर्गत पीएमआरडीए आणि नगररचना विभागाकडून मोठ्या प्रमाणावर बांधकामांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातुलनेत पायाभूत सुविधा आणि रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. रस्त्यांची कामे रखडल्याने अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच मोठमोठे खड्डे आणि पावसामुळे रस्त्यावर साचणाऱ्या मातीमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. परिणामी, अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

निर्बंधाच्या वेळेत म्हा‍ळुंगे परिसरातून होणार्‍या जड वाहनांच्या वाहतुकीवर वाहतूक विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच महापालिकेने मुख्य, तसेच अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Road Potholes
Khadakwasla Dam Water Release: खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांतून विसर्ग सुरू; ४० दिवसांत २२ टीएमसी पाणी सोडले

रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते?

रस्त्यांवरील खड्डे बुजविल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. खड्डे बुजविण्याच्या नावाखाली डांबर-मातीचा थर टाकून काम उरकले जात आहे. रस्त्यावर साचलेली माती आणि चिखल साफ केला जात नसल्याने वाहनांचे घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. म्हाळुंगे येथे खराब रस्त्यावरून वाहन घसरून झालेल्या अपघातात ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आणखी किती जीव गेल्यानंतर महापालिका जागी होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

शहरात पावसाळा सुरू झाल्यापासून रस्त्यांवरील खड्डे हा नेहमीचाच प्रश्न बनला आहे. खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेकडून ठिकठिकाणी कामे केली जात आहेत. मात्र, या कामानंतर रस्त्याची स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याऐवजी काही ठिकाणी अधिकच धोकादायक होत आहे. खड्ड्यांमध्ये डांबर टाकताना रस्त्याच्या बाजूला साचलेली माती, मुरूम आणि राडारोडा हटविण्याकडे दुर्लक्ष केले जाते. पावसाचे पाणी या मातीमध्ये मिसळल्यानंतर रस्त्यावर चिखलाचा थर तयार होतो. दुचाकीस्वारांसाठी हा चिखल अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. काही ठिकाणी तर खड्डे हे थेट माती आणि मुरूमाचा वापर करून भरले आहेत. त्यामुळे रस्त्यावर चिखल व खडी पसरून वाहने घसरून अपघात होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील महापालिका प्रशासन सुस्त आहे.

म्हाळुंगे येथील दुर्घटनेने या प्रश्नाची गंभीरता अधोरेखित केली आहे. खराब रस्त्यामुळे वाहन घसरून एका ११ वर्षांच्या मुलाला जीव गमवावा लागणे ही केवळ दुर्घटना नसून, रस्ते देखभाल यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित करणारी घटना आहे. रस्त्याची पाहणी, खड्ड्यांची दुरुस्ती, दुरुस्तीनंतरची साफसफाई आणि कामाचा दर्जा तपासणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे. रस्ते दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीही पावसाळा सुरू झाला की खड्डे, चिखल आणि घसरडे रस्ते नागरिकांच्या वाट्याला येतात. मग हा पैसा नेमका कुठे खर्च होतो, कामाची गुणवत्ता कोण तपासते आणि निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई कोण करणार, हे प्रश्न कायम आहेत. महापालिकेने केवळ खड्डे बुजविल्याचे आकडे मांडण्यापेक्षा प्रत्येक रस्त्याची पाहणी करणे गरजेचे आहे. खड्डे बुजविल्यानंतर रस्ता स्वच्छ आणि सुरक्षित आहे की नाही, याचीही तपासणी झाली पाहिजे. अन्यथा, कागदावर खड्डे बुजत राहतील आणि रस्त्यावर नागरिकांचे जीव धोक्यात येत राहतील.

Road Potholes
Narhe Dhayari Traffic Jam: नऱ्हे-धायरीत वाहतूक कोंडीचा कहर; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

पॅचवर्क की पैशांची उधळपट्टी?

खड्ड्यांमध्ये खडी आणि डांबर टाकून केलेली तात्पुरती दुरुस्ती काही दिवसांतच उखडत आहे. एकाच ठिकाणी वारंवार खर्च करण्याऐवजी तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि टिकाऊ दुरुस्ती का केली जात नाही? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. काही ठिकाणी तर केवळ मुरूम आणि माती टाकून खड्डे बुजवले जात आहेत. पावसाच्या पाण्यामुळे ही माती रस्त्यावर येत असून, रस्त्यावर चिखल झाल्याने दुचाकीस्वार घसरून पडून त्यांचे आपघात होत आहे.

म्हाळुंगेची घटना इशारा देणारी

खराब रस्त्यावरून वाहन घसरून झालेल्या अपघातात ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केल्यास त्याची किंमत नागरिकांना जीव देऊन मोजावी लागते, याचा हा गंभीर इशारा आहे.

महापालिकेला थेट सवाल

  • खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करूनही रस्ते धोकादायक का?

  • दुरुस्तीनंतर रस्त्यावरील माती आणि चिखल साफ का केला जात नाही?

  • कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?

  • निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई कधी होणार?

  • आणखी किती अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार?

रस्तेदुरुस्तीच्या नव्या निविदा; पण दर्जावर प्रश्नचिन्ह

शहरात महापालिकेमार्फत खड्डे दुरुस्त केले जात आहेत. महापालिकेने तब्बल ७५ कोटी रुपयांची काढलेली निविदा रद्द करून आता नव्याने १० कोटी रुपयांच्या ७ निविदा काढल्या आहेत. ही निविदा काढल्यावर ठेकेदार दर्जेदार काम करणार का हा प्रश्न आहे. ठेकेदाराणे केलेल्या दुरुस्तीचे काम योग्य आहे की नाही हे पाहण्याची कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news